विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची पाटीदार अनामत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी तोगडिया यांच्याविरोधात कट रचल्याचा आरोप हार्दिकने माध्यमांशी बोलताना केला. तत्पूर्वी, पत्रकार परिषदेत तोगडिया यांनी माझे एन्काऊंटर करण्याचा संशय व्यक्त केला होता.

अनेक विषयांवर तोगडियांच्या मताशी मी सहमत नाही. पण या विषयावर आम्हा दोघांचे एकमत आहे. सर्वांना माहीत आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा या कटामागे हात आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ तोगडिया यांच्या विरोधात आहे, हे आता लपून राहिलेले नाही, असेही हार्दिक म्हणाला. तोगडिया यांच्या जीवाला धोका आहे. हिंसाचार आणि खोट्या खटल्यांमुळे त्यांचा आवाज दबला गेला असल्याचे हार्दिकने माध्यमांशी बोलताना सांगितले.

यापूर्वीही हार्दिक पटेलने सोमवारी तोगडिया बेपत्ता झाल्यानंतर एका मागोमाग एक ट्विट करत त्यांचे समर्थन केले होते. झेड प्लस सुरक्षा असतानाही प्रवीण तोगडिया गायब कसे होतात. मग सामान्य माणसाचं काय होऊ शकतो. तोगडिया यांनी पूर्वीही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते, असे ट्विट केले होते.

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली. मनमोहन सिंग सरकारच्या काळात प्रवीण तोगडिया जर बेपत्ता झाले असते. तर भाजपाने संपूर्ण देशभरात हिंसा केली असती. भक्तांना जे बोलायचे आहे ते बोलू शकता. कारण, या मुद्द्यावर जर तुम्ही बोलले नाही तर तुम्हाला पगार मिळणार नाही, असा टोला लगावला. दरम्यान, गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भारत सोलंकी यांनी गुजरातमधील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप केला. तुम्हाला माहीत आहे की, भाजपामध्ये काय झाले आहे. गुजरातमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. प्रवीण तोगडिया यांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.