एम. जे. अकबर यांचा जबाबही नोंदवणार

माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रामाणी यांच्यावर दाखल केलेल्या बदनामी खटल्याची सुनावणी ३१ ऑक्टोबरला होणार आहे. अकबर यांचा जबाबही त्याच दिवशी नोंदवला जाणार आहे.

पत्रकार रामाणी यांनी लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर अकबर यांनी त्यांच्यावर दिल्ली न्यायालयात फौजदारी स्वरूपाचा बदनामीचा खटला भरला आहे. अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता. त्यामुळे कालच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

रामाणी यांचे ‘वादग्रस्त’ ट्वीट्स आणि समाजमाध्यमांवरील तशाच प्रकारच्या पोस्ट्समुळे, अकबर यांनी गेल्या ४० वर्षांमध्ये कमावलेल्या प्रतिष्ठेचे भरून न येणारे नुकसान झाले आहे, असा युक्तिवाद अकबर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गीता लुथरा यांनी केला. यानंतर, अकबर आणि त्यांच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयाने ३१ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. या वेळी अकबर न्यायालयात अनुपस्थित होते.

अकबर यांनी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावरून त्यांच्या प्रतिष्ठेला किती धक्का बसला आहे, हे लक्षात येते, असे त्यांच्या वकील अ‍ॅड्. गीता लुथरा यांनी न्यायालयात सांगितले. एक पत्रकार म्हणून अकबर प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. न्यायालयाने त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन हस्तक्षेप करावा, अशी विनंती लुथरा यांनी केली.

सर्वप्रथम प्रिया रामाणी यांनी अकबर यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप केला. अकबर वेगवेगळ्या नियतकालिकांचे संपादक असताना त्यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप आतापर्यंत किमान २० महिलांनी केला आहे.

खटला मागे घ्या- एडिटर्स गिल्ड

प्रिया रामाणी यांच्याविरुद्धचा बदनामीचा खटला मागे घ्यावा आणि तुमच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया या संघटनेने अकबर यांना केले. अकबर यांनी हा खटला मागे घेतला नाही किंवा इतर महिलांवरही असे खटले दाखल केल्यास महिलांना कायदेविषयक मदत देण्यात येईल, असेही संघटनेने जाहीर केले.