पंतप्रधान नरेंद्र मोदी एका आठवड्याच्या अमेरिका दौऱ्यासाठी शनिवारी रात्री उशीरा अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरात दाखल झाले. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी ह्यूस्टन येथे दाखल झाले आहेत. ह्यूस्टन येथे ‘टेक्सास इंडिया फोरम’कडून आज ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याची जय्यत तयारी सुरू आहे. नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमाला ५० हजारांपेक्षा अधिक अमेरिकी-भारतीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेत होणाऱ्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे.

ह्यूस्टनमधील एनआरजी फुटबॉल स्टेडियममध्ये ही सभा होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यापूर्वी अमेरिकेत पोहोचताच अमेरिकेतील ऊर्जा क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक झाली. याशिवाय अमेरिकेतील ऊर्जा क्षेत्रातील टेलुरियन कंपनीचा भारताच्या पेट्रोनेट कंपनीशी महत्त्वपूर्ण करार झाला आहे. पंतप्रधान मोदींनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याचीही माहिती आहे.

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेत जंगी तयारी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी अमेरिकेतील ह्यूस्टन शहरातील भारतीयांशी संवाद साधणार आहेत. यासाठी तेथील रस्त्यांवर मोदींच्या स्वागतासाठी मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, हा कार्यक्रम यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींचा दौरा २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. दौऱ्यात नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रासमोर भाषण देणार आहेत. तसंच याशिवाय न्यूयॉर्क येथे अनेक द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठकांमध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमनच नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रासमोर भाषण देणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींच्या नंतर काही वेळाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानदेखील बोलणार आहेत.

ह्यूस्टनमधील ‘हाउडी मोदी’च्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर, दुसऱ्या दिवशी, सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भेटणार आहेत. त्यानंतर, मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये पुन्हा त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भेट होणार आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील गेल्या काही दिवसांमधील चौथी भेट आहे. या भेटीमध्ये दोन्ही देशांमधील व्यापारातील वाद, संरक्षण व ऊर्जा क्षेत्रातील संधी, अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रिया यांबरोबरच विभागीय व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही भर देण्यात येणार आहे.

ह्युस्टनमध्ये गुजराती समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपचे गुजरातमधील 320 आमदार आणि काही खासदार यापूर्वीच ह्युस्टनमध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय या सभेला अमेरिका सरकारसह विविध राज्यांमधील नेते, प्रतिनिधी, गर्व्हनर उपस्थित राहणार आहेत.