पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण प्रचारक म्हणून काम करताना आपण काय काय करायचो याबाबत त्यांनी नुकतेच वक्तव्य केले. The Humans of Bombay या प्रसिद्ध फेसबुक पेजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या प्रचारक काळातील काही आठवणींना उजाळा दिला. याबाबत सांगताना मोदी म्हणाले, ”मी प्रचारक असताना दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान पाच दिवस जंगलात जायचो, यावेळी मला स्वत:कडे लक्ष द्यायचे असायचे. त्यामुळेच मी माझ्या मित्रांना आणि विशेषत: तरुणांना कायम सांगतो, की तुमच्या व्यस्त दिनक्रमातून स्वत:साठी वेळ ठेवा, विचार करा आणि स्वत:मध्ये डोकावून बघा. यामुळे तुम्हाला स्वत:ला समजून घेणे सोपे जाईल.”

पुढे ते म्हणतात, अशाप्रकारे तुम्ही स्वत:मध्ये डोकावून पाहिल्याने तुम्ही खास आहात हे तुम्हाला समजेल आणि मग तुम्हाला बाहेरच्या शक्तीची किंवा बाहेरच्या गोष्टींनी प्रेरित व्हायची गरज लागणार नाही, ती प्रेरणा तुमच्या आतच असेल. तसेच आपण १७ वर्षाचे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २ महिन्यांच्या हिमालयीन ट्रिपसाठी गेलो होतो असेही त्यांनी सांगितले. ते म्हणतात, ”तिथून आल्यानंतर मला दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी जगायचे आहे हे मी नक्की केले. मग मी अहमदाबादला जाऊन तिथे काकांच्या कॅंटीनमध्ये मदत केली. त्यानंतर मी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता बनलो. त्यावेळी मी विविध स्तरातील असंख्य लोकांशी जोडला गेलो आणि खूप वेगळ्या स्तरावरचे काम केले. त्यावेळी माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांनी मिळून संघाच्या कार्यालयाची साफसफाई करणे, एकमेकांसाठी चहा आणि पदार्थ बनवणे, भांडी घासणे अशी अनेक कामे केल्याचेही मोदींनी या मुलाखतीत सांगितले.