लसीकरणानंतरही करोनाचा संसर्ग झालेल्या  रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे संसर्गाचे प्रमाण  अधिक असले तरी त्यातील केवळ ९.८ टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली, शिवाय मृत्यूचा दर केवळ ०.४ टक्के होता, असा निष्कर्ष आयसीएमआरच्या एका अभ्यासात नोंदविण्यात आला आहे.

याचा अर्थ लस उपयोगी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. लसीकरणानंतर देशात प्रथमच मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्यात आला असून त्याची मांडणी वैज्ञानिकांनी केली आहे. लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रकार व मृत्युदर या दोन्हीत घट झाल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ लसीकरणाचा चांगला परिणाम होत आहे.

अभ्यासात पुढे म्हटले आहे,की लसीकरण प्रक्रिया वेगाने केली तर त्याचा फायदा होणार आहे व पुढच्या घातक  लाटांपासून संरक्षण मिळणार आहे. सार्स सीओव्ही २ विषाणूचे डेल्टा एवाय१  व एवाय २ प्रकारांचा यात अभ्यास करण्यात आला. डेल्टा एवाय १ व एवाय२ यांच्यात काटेरी प्रथिनात के ४१७ एन हे उत्परिवर्तन दिसते. त्याशिवाय इ ४८४ के, एल ४५२ आर, इ ४८४ क्यू ही उत्परिवर्तनेही यात दिसून आली आहेत. त्यामुळे विषाणूचा जो भाग पेशीला चिकटतो त्यात बदल झाले आहेत.