देशात जर सुधारित नागरिकत्व कायद्यासह (सीएए) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) लागू केली तर हा पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा विजय ठरेल, असे विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार शशी थरुर केले आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ते रविवारी बोलत होते.
शरुर म्हणाले, “वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू झाल्यानंतर जिना पूर्णपणे जिंकले आहेत, असं मी म्हणणार नाही. तर पण मी म्हणेन जिना जिंकत आहेत. तरीसुद्धा अद्याप देशाकडे जीनांची राष्ट्र कल्पना किंवा गांधीजींची राष्ट्र कल्पना निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सीएए कायदा हा जिनांचा धर्माधिष्ठीत राष्ट्र संकल्पनेचा पुरस्कार करणारा आहे, तर गांधीजींची संकल्पना ही सर्व धर्म समभाव अशी आहे.”
“सीएएला जर तुम्ही टेनिस या खेळाच्या स्वरुपात पाहिले तर यातील पहिला सेट किंवा मोठ्या सेटमध्ये जिना आघाडीवर आहेत. त्यानंतर पुढचा सेट जर एनपीआर आणि एनआरसी असेल आणि या गोष्टीही देशात लागू झाल्या तर जिनांचा पूर्णपणे विजय झाला असं आपण समजू शकतो,” अशा शब्दांत थरुर यांनी या तीनही बाबींना विरोध दर्शवला.
शरुर पुढे म्हणाले, “यापूर्वी झालेल्या एनपीआरमध्ये तुमचे पालक कुठे जन्मले हे कधीही विचारले गेले नव्हते. नागरिकत्व नोंदणीसाठी याचा कधीही अधिकृत वापर करण्यात आला नव्हता. मात्र, याता एनपीआरच्या नियमांमध्ये या गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हे पूर्णपणे भाजपाचे संशोधन आहे,”
दिल्लीचा विकास काँग्रेसच्याच काळात झाला
देशाच्या राजधानीचा विकास इथं काँग्रेसचं सरकार असतानाच झाला आहे. गेल्या १५ वर्षांत दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शीला दीक्षित यांनी जे केलं ते त्यांच्यापूर्वी कोणत्याही नेत्यानं केलं नव्हतं आणि नंतरही केलं नाही, अशा शब्दांत थरुर यांनी आम आदमी पार्टीच्या सरकारवरही शरसंधान साधलं.