करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रिपोर्ट येण्यास लागणारा वेळ, यामुळे अनेक रुग्णांना त्रासाला सामोरं जावं लागत. यावर आयआयटी हैदराबाद येथील संशोधकांनी उपाय शोधून काढला आहे. केवळ २० मिनिटात करोना आहे की नाही, याचं निदान करू शकणारी किट संशोधकांच्या पथकानं तयार केली आहे. ही किट तयार करण्यासाठी ५५० रुपये इतका खर्च आला असून, मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यास ३५० इतकाच खर्च येऊ शकतो, असा दावा या संशोधकांनी केला आहे.

देशभरात सध्या करोनाची भीती आहे. अनेक राज्यांची अवस्था चिंताजनक असून, काही राज्यांमध्ये मागील काही आठवड्यांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन बरोबरच टेस्टिंग करण्याची योजना सरकारकडून केली जात आहे. मात्र, चाचणीच्या रिपोर्टसाठी रुग्णांना दोन तीन दिवस वाट बघावी लागत आहे. या समस्येवरच हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील संशोधकांनी नवीन पर्याय शोधून काढला आहे. याबाबत ‘पीटीआय’नं वृत्त दिलं आहे.

“आम्ही करोनाचं निदान करणारी टेस्टिंग किट तयार केली असून, ती २० मिनिटात लक्षण असलेल्या वा लक्षणं नसलेल्या बाधित व्यक्तीचा रिझल्ट देऊ शकते. या किटचं वैशिष्ट्ये म्हणजे ही चाचणी किट रिझर्व्ह ट्रान्सस्क्रिप्शन पॉलिमर्स चेन रिअॅक्शन अर्थात आरटी-पीसीआर मुक्त आहे. या किटसाठी कमी खर्च असून, सोबत बाळगायला सोप्प आहे. त्याचबरोबर कुठेही याच्या साहाय्यानं चाचणी करता येऊ शकते,” अशी माहिती आयआयटीतील इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. शिव गोविंद सिंग यांनी ‘पीटीआय’शी बोलताना दिली.

ही किट तयार करण्यासाठी ५५० रुपये इतका खर्च या टीमला आला. मात्र, ही किट मोठ्या प्रमाणात उत्पादित केल्यास खर्च कमी होऊन प्रत्येक किट ३५० रुपयात तयार होऊ शकते. पथकानं हैदराबादमधील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालयात या किटची चाचणी केली. त्यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे या किटच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे.