आयफोनच्या लॉन्चिग कार्यक्रमानंतर उशीरा घरी परणाऱ्या अॅपल कंपनीच्या एका मॅनेजरचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दुर्देवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री लखनऊ शहरात हा प्रकार घडला. या प्रकरणी गोळी चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वतःच्या बचावासाठी आपण गोळी चालवल्याचे आरोपी कॉन्स्टेबलचे म्हणणे आहे. गंभीर जखमी झालेल्या तिवारी यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

विवेक तिवारी असे गोळीबारात ठार झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. उत्तर प्रदेश पोलिसांतील कॉन्स्टेबर प्रशांत चौधरी याने तिवारी यांच्या कारवर गोळी झाडली यात त्यांचा मृत्यू झाला. लखनऊमध्ये आयफोनच्या लॉन्चिग कार्यक्रमानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तिवारी घरी परतत होते. दरम्यान, रस्त्यात त्यांना पोलिसांनी कार थांबवण्याचा इशारा केला. मात्र, तिवारी यांनी कार थांबवली नाही त्यामुळे कॉन्स्टेबर चौधरी यांनी त्यांच्यावर कारवर गोळी झाडली. यात तिवारी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कॉन्स्टेबल चौधरीवर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तिवारी यांनी आपल्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपण स्वतःच्या बचावासाठी त्यांच्यावर गोळी झाडल्याचे आरोपी कॉन्स्टेबल चौधरीने म्हटले आहे.

दरम्यान, मृत तिवारींच्या पत्नी कल्पना तिवारी यांनी पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित करीत आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना माझ्या पतीवर गोळी झाडण्याचा अधिकार नव्हता. माझी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की त्यांनी माझे म्हणणे ऐकावे.

लखनऊच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच आरोपी कॉन्स्टेबल चौधरीला अटक केल्याचेही सांगितले. मृत तिवारी यांच्या निवृत्त पोलीस अधिकाऱी असलेल्या काकांनी म्हटले की, जरी तिवारींनी कॉन्स्टेबलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असेलच तर त्याच्या पायावर गोळी मारणे अपेक्षित आहे, थेट गळ्यावर गोळी मारणे म्हणजे एन्काऊंटर केल्यासारखे आहे.

दरम्यान, विवेक तिवारी यांच्यासोबत कारमध्ये त्यांच्या सहकारी सना खान या देखील होत्या. सना यांनीच पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही कामाहून घरी परतत असताना समोरुन बाईकवर आलेल्या दोन पोलिसांनी आम्हाला अडवले. यावेळी तिवारी यांनी त्यांना चकवून पुढे निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर बाईकवरील पोलिसांनी आमच्या कारमागे बाईक पळवत विवेक तिवारींच्या गळ्यावर गोळी मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सना यांच्या तक्रारीवरुन गोळी झाडणाऱ्या कॉन्स्टेबलवर हत्येप्रकरणी ३०२चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आपल्यावर सत्य लपवण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोपही सना खान यांनी केला आहे.