30 March 2020

News Flash

‘इस्रो’कडून स्वदेशी स्पेस शटलची चाचणी यशस्वी

इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांनी स्पेस शटल प्रयोग यशस्वी झाल्याबाबत आनंद व्यक्त केला.

| May 24, 2016 02:53 am

अवकाश मोहिमांचा खर्च कमी करण्याच्या दिशेने पहिले पाऊल

फेरवापराच्या अग्निबाण तंत्रज्ञानात भारताने मोठे पाऊल टाकले असून स्वदेशी स्पेस शटलची पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने आंध्र प्रदेशात श्रीहरीकोटा येथून पुनर्वापराचा प्रक्षेपक (रियुजेबल लाँच व्हेइकल) सोडला व नंतर तो पृथ्वीवर परतही आला. सतीश धवन अवकाश केंद्रावरून आरएलव्ही यान (रियुजेबल लाँच व्हेइकल) बुस्टरच्या मदतीने ६५ कि.मी. उंचीवर सोडण्यात आले व नंतर पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परत येऊन बंगालच्या उपसागरात कोसळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबाबत इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. आरएलव्ही टीडी हे स्पेस शटल मॅक पाच म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या पाच पट वेगाने उड्डाणानंतर खालीही आले. त्याच्या दिशादर्शक व नियंत्रण प्रणालीने योग्यप्रकारे काम केले आहे. पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना मोठय़ा तापमानाला या स्पेस शटलने तोंड दिले. श्रीहरीकोटा येथून साडेचारशे किलोमीटर अंतरावर ते पुनप्र्रवेशानंतर कोसळले. या स्पेस शटलचे वजन १.७५ टन असून स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल इतका त्याचा आकार आहे.

सागरात कोसळल्यानंतर त्याचे भाग गोळा करण्यात आले नाहीत कारण पाण्याच्या आघाताने त्याचे तुकडे झाले. हे स्पेस शटल सागरात तरंगण्याच्या उद्देशाने तयार केलेले नव्हते. श्रीहरीकोटा येथील केंद्रांवरून तसेच काही जहाजांवरून या उड्डाणाचे निरीक्षण करण्यात आले. प्रक्षेपण ते अवतरण यासाठी ७७० सेकंदांचा काळ लागला.

सरकारने यात ९५ कोटींची गुंतवणूक केली असून त्याचा वापर उपग्रह पृथ्वीनजीकच्या कक्षेत नेऊन सोडण्यासाठी होणार आहे. त्यामुळे अवकाशमोहिमांचा खर्च दहा पटींनी कमी होईल. वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश मिळू शकले. त्यांची समर्पण वृत्ती व कार्यक्षमता कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे. आजचे स्पेस शटल हे अगदी प्राथमिक प्रारूप असून पुनर्वापराचा अग्निबाण तयार करण्यास अजून १० ते १५ वर्षे कालावधी लागणार आहे. इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी सांगितले की, अवकाश क्षेत्रातील पायाभूत खर्च कमी करण्यासाठी हा प्रयोग यशस्वी ठरणे महत्त्वाचे होते, पण अजून यात बराच पल्ला गाठायचा आहे. अमेरिकेत स्पेस शटल उतरण्यासाठी धावपट्टी असते तशी श्रीहरीकोटा येथे तयार केली जाईल. तिरुअनंतपूरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे के. सिवान यांनी सांगितले की, स्पेस शटलच्या दिशेने टाकलेले हे छोटे पाऊल आहे. या स्पेस शटलची रचना साराभाई स्पेस सेंटरने केली असून त्याच्या चाचण्याही तेथे करण्यात आल्या होत्या.

इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी सांगितले की, अवकाश मोहिमांचा खर्च कमी करण्यासाठी स्वदेशी फेरवापराचे प्रक्षेपक वाहन हे छोटे पाऊल आहे. आज हा प्रयोग यशस्वी झाला असला तरी स्पेस शटल तयार करण्यास किमान दहा वर्षे कालावधी लागेल.

इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांनी स्पेस शटल प्रयोग यशस्वी झाल्याबाबत आनंद व्यक्त केला. भारत अवकाश संशोधनाच्या एका नव्या प्रांतात प्रवेश करीत असून त्यामुळे अवकाश वाहतुकीचा खर्च कमी होईल.

स्वदेशी स्पेस शटल

  • प्रकल्प संचालक- के. सिवान
  • वजन – १.७५ टन
  • आकार- एसयूव्ही वाहनाइतका
  • उद्देश- अवकाश मोहिमांचा खर्च कमी करणे
  • खर्च- ९५ कोटी रुपये
  • पृथ्वीपासून गाठलेली उंची -६५ किलोमीटर
  • उड्डाण ते अवतरण कालावधी- ७७० सेकंद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 2:53 am

Web Title: indian launch first shuttle space
टॅग Indian
Next Stories
1 इटालीयन नौसैनिकाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २६ मे रोजी सुनावणी
2 हिरोशिमातील अणुहल्ल्याबाबत माफी मागणार नाही- ओबामा
3 बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला; एनआयए न्यायालयाचे आरोपपत्र
Just Now!
X