बेंगळूरु : भारतीय अवकाश संस्था म्हणजे इस्रोच्या या वर्षातील पहिल्या उपग्रह प्रक्षेपण मोहिमेची उलटगणती सुरू झाली आहे. भारतीय प्रक्षेपकाच्या मदतीने ब्राझीलचा उपग्रहही श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपावणार आहे.  सतीश धवन अवकाश केंद्रावरून रविवारी सकाळी १०.२४ वाजता हे उड्डाण होणार असून त्याची उलटगणती शनिवारी ८.५४ वाजता सुरू  झाली. पीएसएलव्ही सी ५१ प्रक्षेपकाच्या मदतीने हे उपग्रह सोडण्यात येणार असून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे हे ५३ वे उड्डाण आहे. त्याच्या मदतीने अ‍ॅमेझॉनिया १ हा ब्राझीलचा उपग्रह सोडण्यात येत आहे. एकूण १८ सह -उपग्रह सोडण्यात येणार आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील अवकाश तळावरून ते  झेपावतील. यात  ‘सतीश धवन’ विद्यार्थी उपग्रहाचा समावेश असून तो चेन्नई येथील स्पेस किड्झ इंडिया यांनी तयार केलेला आहे.

त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र कोरलेले आहे. एसके १ चमूने म्हटले आहे, की पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर योजनेसाठी घेतलेला पुढाकार व अवकाश क्षेत्राचे केलेले खासगीकरण याचा गौरव करण्यासाठी त्यांची छबी या उपग्रहावर कोरली आहे. भगवद् गीता असलेले डिजिटल कार्डही या उपग्रहात आहे. बेंगळुरु येथील इस्रोच्या न्यूस्पेस इंडिया लि. या कंपनीसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. पीएसएलव्ही सी ५१ च्या मदतीने या कंपनीकडून केले जाणारे हे पहिले उड्डाण आहे. अमेरिकेतील सियाटल येथील सॅटेलाइट राइड शेअर व स्पेसफ्लाइट इनकार्पोरेशन यांचा त्यात सहभाग आहे. एनएसआयएलचे अध्यक्ष व व्यवस्थापैकीय संचालक जी. नारायणन यांनी सांगितले, की या उड्डाणाची आम्ही आशेने वाट पाहत आहोत. ब्राझीलचा उपग्रह आम्ही सोडत आहोत याचा आम्हाला आनंदच आहे. ब्राझीलचा अ‍ॅमेझोनिया उपग्रह ६३७ किलो वजनाचा असून भारताकडून सोडला जाणारा त्या देशाचा तो पहिला उपग्रह आहे. ऑप्टिकल अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट ऑफ  नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रीसर्च या संस्थेचा हा उपग्रह आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार हा दूरसंवेदन उपग्रह असून अ‍ॅमेझॉनमधील जंगलतोड त्यातून नेमकी समजणार आहे. इस्रोच्या संकेतस्थळावर या उपग्रह उड्डाणाचे थेट प्रक्षेपण केले जाणार असून युट्यूब, फेसबुक, ट्विटरवरही ते उपलब्ध आहे. एकूण अठरा उपग्रह यात सोडले जाणार असून त्यात इस्रोच्या इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड अ‍ॅथॉरायझेशन सेंटरच्या चार उपग्रहांचा समावेश आहे तर एनएसआयएलचे १४ उपग्रह आहेत. एसकेआयच्या उपग्रहावर २५ हजार नावे कोरण्यात आली असून हा उपग्रह सोडण्याआधी त्यावर कोरण्यासाठी लोकांकडून नावे मागवण्यात आली होती.