माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी इन्फोसिसला त्यांचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) राजीव बन्सल यांना १२.१७ कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कंपनीला या रकमेवरील व्याजही द्यावे असा आदेश लवादाने दिला आहे. कंपनी आपले १७.३८ कोटी रुपयांची सेवरन्स रक्कम दिली नसल्याची तक्रार त्यांनी केली होती.

बन्सल यांनी २०१५ मध्ये इन्फोसिसला रामराम ठोकला होता. कंपनी सोडल्यानंतर त्यांना १७.३८ कोटी रुपयांची सेवरन्स रक्कम मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, कपंनीने त्यांना केवळ ५.२ कोटी रुपये दिले. कंपनीच्या जबाबदारीचे पालन केले नसल्याचे कारण सांगत उर्वरित रक्कम रोखण्यात आली होती. त्यानंतर बन्सल यांनी लवादात धाव घेतली होती. इन्फोसिसने उलट बन्सल यांच्याविरोधात क्लेम सादर करताना प्रारंभी दिलेले ५.२ कोटी रूपयांचा सेवरन्स परत करण्याची मागणी केली, आणि उर्वरित नुकसानीची भरपाई करण्यास सांगितले.

बन्सल यांना गप्प बसण्यासाठी सेवरन्स पॅकेज देण्यात आला असल्याचे कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती म्हणाले होते. याप्रकारामुळे कंपनीचे तत्कालीन सीईओ विशाल सिक्का आणि संचालक मंडळाच्या चार सदस्यांना कंपनीच्या बाहेर पडावे लागले होते.