कासिम सुलेमानीच्या मृत्यूनंतर अमेरिकेबरोबर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला तर, आम्ही त्याचे निश्चित स्वागत करु असे इराणच्या भारतातील राजदूताने म्हटले आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ले केल्यानंतर काही तासांनी इराणच्या भारतातील राजदूताने हे विधान केले.

“जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने नेहमीच चांगली भूमिका बजावली आहे. भारतही या प्रदेशामध्ये आहे. अमेरिकेबरोबर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी सर्वच देशांनी खासकरुन भारताने पुढाकार घेतला तर आम्ही त्याचे स्वागतच करु” असे इराणचे भारतातील राजदूत अली चीगीनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. इराणच्या दिल्लीतील दूतावासामध्ये आज कासिम सुलेमानी यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर अली चीगीनी माध्यमांशी बोलत होते.

“आम्हाला युद्ध नको आहे, या प्रदेशात सर्वांसाठी शांतता आणि समृद्धी हवी आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने काही पाऊल उचलले तर निश्चित आम्ही त्याचे स्वागत करु” असे इराणचे भारतातील राजदूत म्हणाले. इराकमधील अमेरिकन लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्याचे त्यांनी समर्थन केले. हा आम्ही स्वसंरक्षणार्थ केलेला हल्ला होता असा दावा त्यांनी केला.