अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी शस्त्रसंधीसंबंधी आवाहन केल्यानंतर काही तासच त्यास मोडता घालून इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटनेत हिंसाचारास प्रारंभ झाला. इस्रायलने उखळी तोफांच्या केलेल्या माऱ्यात चार पॅलेस्टिनी ठार झाल्याचा आरोप हमास संघटनेच्या दहशतवाद्यांनी केला. राफिया भागात झालेल्या या हल्ल्यात अन्य २० जण जखमी झाल्याचे पॅलेस्टिनींच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
दरम्यान, या सर्व घटनांकडे आपले ‘लक्ष’ असल्याचे सूचक वक्तव्य इस्रायलच्या लष्करी दलाच्या प्रवक्त्याने केले. या एकूण पाश्र्वभूमीवर शस्त्रसंधीच्या आवाहनास कोणी हरताळ फासला, याचा उलगडा झाला नाही, परंतु उभय बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी हे दिल्लीत आले असतानाच मानवतेवर आधारित शस्त्रसंधी झाल्याची घोषणा इस्रायल आणि पॅलेस्टिनींमध्ये शुक्रवारी पहाटे झाली होती. याआधीच्या तुलनेत शुक्रवारी उभयपक्षी हल्ले कमी झाले असले तरी ते पूर्णपणे थांबलेले नाहीत. आतापर्यंत इस्रायलने केलेल्या हल्ल्यात पॅलेस्टिनींच्या मृतांची संख्या आता १,४५० पर्यंत पोहोचली आहे. याच धूमश्चक्रीत इस्रायलचेही ६१ सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.