बाबरी विध्वंसाला २८ वर्षे झाली, आता तरी हे प्रकरण मिटवा अशी विनंती पक्षकार इकबाल अन्सारी यांनी कोर्टाला केली आहे. बाबरी मशीद विध्वंस प्रखरणी ३० सप्टेंबरा लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे. न्यायाधीश एस.के.यादव यांनी निकालाच्या दिवशी लालकृष्ण आडवाणींसह सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान हे प्रकरण आता मिटवण्याची विनंती बाबरीचे पक्षकार इकबाल अन्सारी यांनी कोर्टाला केली आहे.

बाबरी मशीद  विध्वंस प्रकरणात निकाल देण्यासाठी मागच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली होती. या प्रकरणात एकूण ३२ आरोपी आहेत. यात उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा हे आरोपी आहेत. ६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी अयोध्येत मशीद पाडली होती. त्यावेळी लालकृष्ण आडवणी, मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे वरिष्ठ नेते राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत होते.

काय म्हणाले आहेत इकबाल अन्सारी?
बाबरी विध्वंस प्रकरण हे हिंदू मुस्लीम वादाचे कारण ठरले होते. आता सुप्रीम कोर्टाकडून या प्रकरणी निकाल आला आहे तर हे प्रकरण पूर्णपणे संपवले जावे. आमची इच्छा आहे की हिंदू आणि मुस्लिमांनी आता मंदिर किंवा मशिदीच्या नावावर कोणतेही असे काम करु नये जे देशाच्या प्रगतीत अडथळा बनू शकते. त्यामुळे बाबरी विध्वंसाचे प्रकरण आता संपवावे अशी विनंती आहे असं इकबाल अन्सारी यांनी म्हटलं आहे.