अभिनेत्री स्वरा भास्करने तिचा ३१वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. बिहारमधील बेगुसराई मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांच्यासाठी स्वराने प्रचार केला. स्वरा भास्करने तिच्या ट्विटर अकाऊंटवर या भाषणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

देशाला कन्हैयाकुमारसारख्या सुशिक्षित, समर्पित आणि प्रगतीशील दृष्टिकोन ठेवणाऱ्या नेत्यांची गरज आहे असं स्वरा म्हणाली. स्वराचे भाषण ऐकण्यासाठी बेगुसराईमध्ये लोकांनी बरीच गर्दी केल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ‘बेगुसराई कह रहा है रोटी, अस्पताल, शिक्षा और रोजगार, कन्हैयाकुमार, कन्हैयाकुमार, कन्हैयाकुमार,’ अशी घोषणा तिने भाषणादरम्यान दिली. तर ‘जिए ओ बिहार के लाला,’ म्हणत तिने कन्हैयाकुमार यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी दलित नेते जिग्नेश मेवाणीसुद्धा मंचावर उपस्थित होते. कन्हैयाकुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासोबतचा एक सेल्फीसुद्धा स्वराने ट्विटरवर पोस्ट केला. ‘हे दोघं गेम चेंजर्स आहेत. संसदेत या दोघांसारख्या नेत्यांची आपल्याला गरज आहे,’ असं कॅप्शन तिने या सेल्फीला दिला आहे.