तक्रारदार महिलेच्या आक्षेपामुळे निर्णय

नवी दिल्ली : सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्धच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीतीतून न्या. एन.व्ही. रमण यांनी गुरुवारी माघार घेतली.

न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती नेमली गेली आहे. या समितीतून न्या. रमण हे बाजूला झाल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांनी दिली. सरन्यायाधीशांवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने न्या. रमण यांच्या सहभागास आक्षेप घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घडामोड झाली.

न्या. रमण हे न्या. गोगोई यांचे जवळचे मित्र असून नेहमीच त्यांच्या घरी जात असतात, असा आक्षेप या महिलेने घेतला होता. ती शुक्रवारी समितीपुढे हजर होण्याचे ठरले आहे.

न्या. बोबडे यांच्या नावे लिहिलेल्या पत्रात या महिलेने, सरन्यायाधीशांविरुद्धच्या आपल्या आरोपांची तपासणी करण्यासाठीच्या समितीत केवळ एक महिला न्यायाधीश असल्याबद्दलही प्रश्नचिन्ह लावले असून, ही बाब विशाखा प्रकरणातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार नसल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विशाखा प्रकरणात ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संबंधित समितीत बहुतांश महिला असणे आवश्यक आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांकडून निदर्शनास आणले जात आहे.