ठराव दाखल करण्याचा भाजपचा इशारा

कर्नाटकात सत्तेवर आल्यानंतर भाजपने विधानसभा अध्यक्ष के.आर. रमेशकुमार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा इशारा दिला आहे. रमेश कुमार यांनी स्वत:हून पद सोडले नाही, तर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाईल असे पक्षाच्या सूत्रांनी शनिवारी सांगितले.

कुमार यांना पद सोडण्याचा अप्रत्यक्ष संकेत पोहोचवण्यात आला आहे. संकेताप्रमाणे विधानसभाध्यक्षपद हे सत्ताधारी पक्षाकडे असते. एका भाजप आमदाराने सांगितले, की रमेशकुमार यांनी स्वत:हून पद सोडले नाही तर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणावा लागेल. आता आमचे पहिले उद्दिष्ट हे विश्वास ठरावजिंकणे असून सोमवारी वित्त विधेयक मंजूर केले जाईल. विधानसभा अध्यक्षपद हे कधीच विरोधी पक्षाला दिले जात नसते या कडे त्यांनी लक्ष वेधले.विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर रमेशकुमार यांच्यावर अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे.

नाटय़मय घडामोडीत भाजपचे नेते बी.एस येडीयुरप्पा यांचा शुक्रवारी मुख्यमंत्रिपदी शपथविधी झाला. त्याआधी विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी रमेश जारकीहोळ, महेश कुमाथल्ली या काँग्रेसच्या दोन आमदारांना, तसेच अपक्ष आर. शंकर यांना अपात्र ठरवले होते. दोन दिवसात उर्वरित आमदारांबाबत निर्णय घेणार असून त्यात जनतादल धर्मनिरपेक्षच्या दोन आमदारांचा समावेश आहे, असे रमेशकुमार यांनी म्हटले होते. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटकातील सरकार कोसळले होते. त्यामुळे आता पुन्हा भाजपच्या हाती सत्ता आली आहे.

दरम्यान कर्नाटकात भाजप सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अनैतिक असून त्यात १११ आमदारांच्या पाठिंब्याची यादी देताना सध्या मुंबईत असलेल्या काही आमदारांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.

भाजप सरकारची स्थापना हा घोडेबाजाराचा विजय- सिद्धरामय्या

बंगळूरु: कर्नाटकमधील भाजप सरकार ‘घटनात्मकरीत्या किंवा नैतिकदृष्टय़ा’ स्थापन झालेले नसल्याचे सांगून, हा ‘घोडेबाजाराचा विजय’ असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने राज्यपाल कार्यालयाचा दुरुपयोग केल्याचाही आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असलेले सिद्धरामय्या यांनी केला.येडियुरप्पा यांनी शपथ घेणे हे घटनाविरोधी आहे. बहुमत नसतानाही भाजप राज्यपाल कार्यालयाचा दुरुपयोग करत आहेत, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना सांगितले. अध्यक्षांनी ३ आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर विधानसभेचे संख्याबळ २२१ असून, बहुमतासाठी आवश्यक असलेली संख्या १११ झाली आहे. मात्र भाजपकडे फक्त १०५ आमदार आहेत. भाजपला १११ आमदारांची यादी सादर करावी लागणार आहेत. सध्या मुंबईत मुक्कामाला असलेले बंडखोर आमदार काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे असल्यामुळे त्यांची नावे दिली जाऊ शकत नाहीत, यावर सिद्धरामय्या यांनी भर दिला.