खासगी क्षेत्रातली विमान कंपनी ‘इंडिगो’ने नऊ पत्रकारांवर प्रवास बंदी घातली आहे. कंगना रणौत उपस्थित असलेल्या विमानात घुसून या पत्रकारांनी गोंधळ घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे या पत्रकारांना इंडिगोने १५ दिवसांसाठी प्रवासबंदी केली आहे.

डीजीसीएनं म्हटलं होतं कारवाई करा

डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) इंडिगोला ९ सप्टेंबरच्या घटनेसंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. डीजीसीएचं म्हणणं होतं की, चंदीगड-मुंबईच्या फ्लाईटमध्ये गोंधळ घालणाऱ्या लोकांविरोधात योग्य कारवाई करण्यात यावी. कंगना या विमानात पहिल्या रांगेत बसली होती. जेव्हा विमान मुंबई विमानतळावर उतरलं टीव्ही रिपोर्टर्स आणि छायाचित्रकारांनी तिचे फोटो घेण्यासाठी थेट विमानात घुसले होते.

डीजीसीएला प्रसिद्ध कराव्या लागल्या होत्या नव्या गाईडलाइन्स

या घटनेनंतर डीजीसीएने नियमांमध्ये थोडा बदल केला. त्यामुळे आता विमानात विनापरवानगी कोणीही फोटो काढू शकणार नाही. विमानाचं उड्डाण, लँडिंग आणि सुरक्षित ठिकाणी उभं राहिल्यानंतर फोटो काढण्याची परवानगी नाही. तसेच विमान प्रवासादरम्यान रेकॉर्डिंगचं कोणतंही उपकरण वापरण्यास परवानगी असणार नाही.