News Flash

‘थँक यू मोदीजी’…आरोपपत्रानंतर कन्हैय्या कुमारची प्रतिक्रिया

'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्ली पोलिसांचे आभार मानतो'

(संग्रहित छायाचित्र)

जेएनयू (JNU) घोषणाबाजी प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून अखेर तीन वर्षांनंतर कन्हैय्या कुमारसह 10 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. याबाबत, ‘मला काही माहिती नाही, पण जर हे खरं असेल तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्ली पोलिसांचे आभार मानतो’ अशी खोचक प्रतिक्रिया कन्हैय्या कुमारने दिली आहे.

आरोपपत्र दाखल करण्यात आल्याबाबत मला काही माहिती नाही, पण जर हे खरं असेल तर मी खरंच मोदीजी आणि दिल्ली पोलिसांचे आभार मानतो. तीन वर्षांनंतर नेमकं निवडणुकांच्या आधी आरोपपत्र दाखल करण्यामागे राजकीय डाव आहे हे स्पष्ट होतंय, पण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया कन्हैय्या कुमारने वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिलीये. ‘मोदीजी आम्ही तुमच्याकडे 15 लाख रुपये, रोजगार आणि अच्छे दिन मागितले होते. देशासाठी अच्छे दिन कधी येतील माहित नाही पण निवडणुकांपूर्वी आमच्याविरोधात आरोपपत्र दाखल झालंय. जर हे खरं असेल तर मोदीजी आणि मोदींच्या पोलिसांचे आभार’ असं ट्विट कन्हैय्याने केलं आहे. तर, याप्रकरणी एनडीव्हीशी बोलताना कन्हैय्या म्हणाला की, याबाबत मला काहीही माहिती नाहीये. पण जर हे खरं असेल तर दिल्ली पोलिसांनी न्यायालयात पुरावे सादर करायला हवे, आणि या प्रकरणाची तातडीने सुनावणी व्हायला हवी. दिल्ली पोलिसांकडे पुरावा नसल्याचा दावा कन्हैय्याने केला आहे. एका बिनबुडाच्या एफआयआरच्या आधारे मला अटक करण्यात आली होती. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, आणि न्यायालयात सरकारने आखलेल्या कटाचा पर्दाफाश होईल असंही कन्हैय्या म्हणाला.


दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) देशविरोधी घोषणाप्रकरणी अखेर तीन वर्षांनी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. जवळपास 1200 पानांच्या आरोपपत्रात 10 मुख्य आरोपी ठरवण्यात आले असून यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यासह, अनिर्बान भट्टाचार्य आणि उमर खालिद यांचाही समावेश आहे. कन्हैय्या कुमारनेही देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, त्याला संबंधित कार्यक्रमाची आधीपासून कल्पना होती असं आरोपपत्रात म्हटलं आहे. तसंच घोषणाबाजी करतानाचा कन्हैय्या कुमारचा व्हिडीओ देखील मिळाला असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय.

दिल्लीतील जेएनयूमध्ये तीन वर्षांपूर्वी 9 फेब्रुवारी 2016 रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. संसदेवर हल्ल्या करणारा दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ येथे घोषणाबाजी झाली आणि या संघटनेचं नेतृत्व कन्हैय्या कुमार यांनी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ आवारातील या आंदोलनासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी तब्बल 3 वर्षांनी आज दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामध्ये कन्हैय्या कुमारसह 10 जणांची नावे आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी कन्हैय्या कुमारसह इतरांना अटक देखील केली होती. त्यानंतर देशाचं राजकारण ढवळून निघालं होतं. यावरुन भाजपावर मोठी टीकेची झोड उठली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 6:29 pm

Web Title: kanhaiya kumar reaction on jnu charge sheet
Next Stories
1 पाक हाय कमिशनच्या कर्मचाऱ्यावर अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप
2 मोदींचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी एक हजाराहून अधिक झाडांची कत्तल
3 जेएनयू घोषणाबाजी : तीन वर्षांनंतर कन्हैय्यासह 10 जणांविरोधात आरोपपत्र
Just Now!
X