बुरहान वानीच्या मृत्यूनंतर सुरू झालेला जम्मू काश्मीरमधील हिंसाचार अजूनही सुरूच आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात दोन युवक ठार तर ३० जण जखमी झाले आहेत. काश्मीर खोऱ्यातील दक्षिण बिजबेहरा, बंदीपुरा, शोपियन आणि कुलगाममध्ये हिंसाचार सुरूच आहे.
बंदीपुरा येथे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत मुस्तफा अहमद मीर (वय १९) हा युवक अश्रूधुराच्या नळकांड्याचा मार लागल्याने मृत्यूमुखी पडला. तर शोपियन येथे सुरक्षा दलांनी केलेल्या पेलेट गनच्या माऱ्यात छर्रे छातीत व हातात घुसल्याने शाहीद अहमद शाह हा ठार झाला. येथे तिघे जखमी झाले. श्रीनगर येथील बटामालू येथे ईदनिमित्त नमाज अदा झाल्यानंतर चकमक झाली. कुलगाम येथे पेलेट गनच्या माऱ्याने सुमारे ८ जण जखमी झाले. उत्तर काश्मीर येथील कुलगाम येथे ४ जण जखमी झाले.
काश्मीरमधील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून सुरक्षेनिमित्त नागरिकांना ईदनिमित्त नमाज अदा करण्यास नकार दिला आहे. मशिदी सील केल्यामुळे येथील नागरिक त्याचा निषेध करत आहेत. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि माजी मुख्यमंत्री ओमर अुब्दल्ला यांनीही नमाज अदा केलेली नाही.
सकाळी आठच्या सुमारास सुरक्षा दल व नागरिकांत चकमकीस सुरूवात झाली. अजूनही काही भागात सुरक्षा दल आणि नागरिकांमध्ये चकमक सुरूच आहे. ईदच्या दिवशी काश्मीरमधील महत्वाच्या मशिदी बंद असण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्थानिकांना परिसरातील छोटया मशिदीत जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
अनेक संवेदनशील भागात सुरक्षा दलांनी हेलिकॉप्टर आणि ड्रोन कॅमेरे तैनात केले असून प्रत्येकठिकाणी लक्ष ठेवण्यात आले आहे. टेलिकॉम कंपन्यांना पुढील ७२ तासांसाठी इंटरनेट सुविधा बंद करण्याचा आदेश राज्य प्रशासनाने दिला आहे. फक्त बीएसएनएलची सुविधाच नागरिकांना वापरता येईल, असे सांगण्यात आले.