प्रयोगशाळेने रिपोर्ट तयार करताना टायपिंगची केलेली एक छोटीशी चूक वृद्धासह त्याच्या कुटुंबाला चांगली महाग पडली. उत्तर प्रदेशात अमरोहमध्ये ही घटना घडली. या वृद्ध व्यक्तीला सर्दी झाली होती व त्यांचा घसा खराब झाला होता. उपचारासाठी म्हणून ते गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले होते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

वृद्ध व्यक्तीला ताप येत असल्याने त्यांना मोरादाबाद येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे त्यांना सहा एप्रिलला रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले अशी माहिती अमरोहाचे पीएचसी डॉ. उमर फारुख यांनी दिली. या वृद्धाचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी अलीगड मेडिकल क़ॉलेजमध्ये पाठवण्यात आले. याच ठिकणी करोना व्हायरसची चाचणी सुद्धा केली जाते.

सोमवारी रात्री त्यांचा रिपोर्ट आला. “मोरादाबादमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला रिपोर्टच्या आधारावर त्या वृद्धाला करोनाची लागण झाल्याचे सांगितले” अशी माहिती डॉ. उमर फारुख यांनी दिली. त्यानंतर तात्काळ आठ रुग्णावाहिका त्या व्यक्तीच्या कुटुंबातील आठ सदस्यांना क्वारंटाइन करण्यासाठी पोहोचल्या. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध सुरु झाला.

“त्याच्या कुटुंबातील सर्व आठ सदस्यांचे नमुने घेण्यात आले पण त्या सर्वांचा करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला” अशी माहिती डॉ. उमर फारुख यांनी दिली. त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव चुकून करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत टाकण्यात आले असे मोरादाबादच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

अलीगड प्रयोगशाळेने रिपोर्टची छपाई करताना चूक केल्यामुळे त्या व्यक्तीला करोना पॉझिटिव्ह ठरवण्यात आले असे मोरादाबाद मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्या ज्येष्ठ नागरिकाला अखेर बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.