झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल आघाडीस यश मिळाले आहे. तर पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला विरोधीपक्षात बसण्याचा जनादेश मिळाला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून २९ डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेससह देशभरातील भाजपाविरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याचे शक्यता असली तरी, झारखंडमध्ये सत्तेत आलेल्या या तिन्ही पक्षांच्या आघाडातील एक प्रमुख पक्ष असलेल्या ‘राजद’ चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची मात्र या शपथविधी सोहळ्यास अनुपस्थिती राहणार आहे.

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे ते २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, अशी माहिती राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी माध्यमांना दिली आहे.

दुसरीकडे झारखंडेच भावी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आपल्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आज दिल्लीला रवाना झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची ते दिल्लीत भेट घेणार असुन त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देणार आहेत.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हेमंत सोरेन यांनी, आजपासून या राज्यासाठी नवा अध्याय सुरू होत आहे. मी नागरिकांना विश्वास देतो की, कोणाचाही अपेक्षाभंग होणार नाही. सर्वांची काळजी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांचे देखील आभार व्यक्त केले होते.