केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक ३ ची घोषणा केली असून ३१ ऑगस्टपर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन कायम असणार आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. शाळा, कॉलेज ३१ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असून व्यायामशाळा तसंच योगा इन्स्टिट्यूट ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

जाणून घेऊयात अनलॉक ३ मध्ये काय सुरु आणि काय बंद – 

– नाइट कर्फ्यू हटवण्याचा निर्णय. यामुळे रात्री फिरण्यावरील निर्बंध हटले आहेत.
– योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळा ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी. सोशल डिस्टन्सिंगचं पालन तसंच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात येणार आहेत.
– सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्याशी संबंधित नियमांचं पालन करत स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी
–  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
– आंतरराष्ट्रीय प्रवाशांना वंदे भारत मिशन अंतर्गत मर्यादित प्रवासासाठी परवानगी.
– कंटेनमेंट झोन आणि बाहेरही मेट्रो रेल, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, चित्रपटगृह, बार, सभागृह बंदच राहणार
– सामाजिक, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
– आंतरराज्य आणि राज्यांतर्गत लोकांच्या प्रवासावर व मालवाहतुकीवर निर्बंध नसणार आहेत. यासाठी वेगळी परवानगी किंवा ई-परमिटची  गरज नाही.

परिस्थितीचा विचार करुन या गोष्टी कधी सुरु करायच्या याबाबत निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जावी असं गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना सांगितलं आहे. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. संबंधित जिल्हाधिकारी तसंच राज्य सरकार कंटेनमेंट झोनची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करतील. राज्य सरकार कंटेनमेंट झोनमधील हालचालींवर लक्ष ठेऊन असेल. तसंच नियमांचं उल्लंघन होणार नाही यावर लक्ष ठेवेल असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितलं आहे.

कंटेनमेंट झोनबाहेर काय सुरु ठेवायचं याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकार गरज वाटल्यास कंटेनमेंट झोनबाहेरही काही गोष्टींवर निर्बंध आणू शकतं.