सोशल मीडिया हे सध्या सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम म्हणून ओळखले जाते. व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमात दिवसागणिक हजारो मेसेज आणि व्हिडियो येत असतात. त्यातील काही मेसेज आपण लक्षपूर्वक वाचतो पण जास्त मेसेज असतील तर मात्र आपण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्षही करतो. पण एका व्यक्तीने मात्र या माध्यमावर आलेला जाहिरातीचा मेसेज अतिशय गांभिर्याने घेत आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला. पैशांसाठी किडनी विकल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल पण एकाने प्रत्यक्ष किडनी विकण्याचा प्रयत्न केला. पैशांची आवश्यकता असल्याने त्याने हे पाऊल उचलले. बंगळुरुमधील एका व्यक्तीने आपली किडनी थोड्याथोडक्या नाही तर तब्बल १.६ कोटी रुपयांना विकण्याचे ठरवले. ही जाहिरात आपल्याला व्हॉट्सअॅपवर आल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे ती एका डॉक्टरांकडून आल्याचे त्याचे म्हणणे आहे. या डॉक्टरने आपल्याला कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये जायला सांगिल्याचे तो म्हणाला.

किडनी विकायला निघालेल्या या व्यक्तीचे नाव एम.बी सोमशेखर असून डॉ. अरुण डेव्हीड यांनी ही जाहिरात पोस्ट केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये नामांकित शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख आहेत. सोमशेखर हे स्टेनोग्राफर असून त्यांना पैशांची खूप आवश्यकता असल्याने ते त्यांची किडनी विकायला निघाले. या तोतया व्यक्तीने आपल्याला १.६ कोटी रुपये मागितल्याचे सांगण्यात आले. सोमशेखर यानंतर किडनी काढण्याची प्रक्रिया विचारण्यासाठी ट्रान्सप्लांट कोऑर्डीनेटरकडे गेला. तिला त्याने व्हॉटसअॅपवर आलेल्या जाहिरातीबद्दल सांगितले. मात्र त्या नेमक्या जाहिरातीची लिंक किंवा वेबसाईटचे नाव त्याला आठवत नसल्याचे त्याने सांगितले. अशाप्रकारे आपल्याकडे एखादा व्यक्ती किडनी विकण्यासाठी आल्याने हॉस्पिटलमधील लोकांना धक्का बसला. डॉ. डेव्हीड यांना या प्रकाराबद्दल विचारले असता हा मोबाईल क्रमांक आपला नसल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकारानंतर डेव्हीड यांनी तक्रार दाखल केली आहे. सायबर सेलकडून या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. मात्र या प्रकारामुळे आपल्या देशात सोशल मीडियाच्या माध्यमातून कशाप्रकारे गैरप्रकार होतात हे पुन्हा एकदा समोर आले आहे.