बिहार विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री व जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या पाच आमदारांनी लाल प्रसाद यादव यांनी नमस्कार करत नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलामध्ये प्रवेश केला आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं देशभरात पुन्हा एकदा पक्षांतराची लाट आल्याचं चित्र आहे. गुजरातपाठोपाठ बिहारमध्ये याची पुनरावृत्ती झाली असून, लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं विधान परिषदेच्या तोंडावर धक्का दिला आहे. राजदच्या पाच विधान परिषद आमदारांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत जदयूमध्ये प्रवेश केला.

राधा चरण सेठ, संजय प्रसाद, रणविजय सिंह, कमरे आलम व दिलीप रॉय अशी पक्षांतर केलेल्या आमदारांची नावं आहेत. जदयूनं याला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. बिहार विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी मतदान होत आहे. ६ जुलै रोजी मतदान होणार असून, त्यापूर्वीच राजदमध्ये फूट पडल्यानं पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

राजदचे सध्या विधान परिषदेत आठ आमदार होते. एकाचवेळी दोन तृतीयांश आमदारांनी पक्षाला रामराम केला आहे. पाचही आमदार जदयूमध्ये जाणार असल्याचं आधीपासूनच निश्चित झालं होतं. त्याचबरोबर जदयूनं कमरे आलम यांना पक्षात घेऊन मुस्लीम व्होट बँक आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न केला असल्याच आता बिहारच्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.