नरेंद्र मोदी सरकारमधील माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू हे आपल्या हटके वक्तव्यांसाठी पत्रकारांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि मध्य प्रदेशमध्ये एका इव्हीएममधील बिघाडानंतर निर्माण झालेल्या वादावरून त्यांनी विरोधी पक्षावर आपल्या स्टाईलने टोला लगावला आहे. विरोधी पक्षांच्या आरोपांवर टिप्पणी करताना त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची (इव्हीएम) नवी व्याख्या केली आहे. काही पक्षांसाठी इव्हीएम म्हणजे ‘एव्हरी व्होट फॉर मोदी’ असंच वाटतंय, असे वक्तव्य नायडू यांनी केले आहे. त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे मात्र उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली.

नायडू म्हणाले, काँग्रेस-समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचा उत्तर प्रदेशमध्ये पराभव झाला आहे. लोकांच्या विचारात बदल झाला आहे. त्यांना विकास हवा आहे आणि भाजप ते पूर्ण करू शकते.
इतका प्रचार केल्यानंतरही काय झालं हे आपण यूपीत पाहिलं आहे. काही लोकांनी आपल्या पराभवाचं खापर इव्हीएमवर फोडलं आहे. आता इव्हीएमला एक नवा आयाम जोडला गेला आहे. इव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर मोदी. तुम्ही कोणतेही बटन दाबा, मत मोदींनाच जाईल, असे मिश्किलपणे ते म्हणाले. इव्हीएममध्ये खरंच काही बदल केले असते तर पंजाब आणि दिल्लीत आमचा पराभव कसा झाला असता, असेही ते म्हटले.
विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनच्या (वीआयएफ) एका परिषदेत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि बिजू जनता दलाचे खासदार जय पंड्या हेही उपस्थितीत होते. केंद्र सरकारमध्ये महत्वाची भूमिका निभावत असलेले अनेक मंत्री किंवा अधिकारी हे विवेकानंद फाऊंडेशनशी संबंधित आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, निती आयोगाचे आर्थिक सल्लागार विवेक देवरॉय आणि दिललीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आदी विवेकानंद फाऊंडेशनशी संबंधित आहेत.