भारताने २७ मार्च रोजी मिशन शक्ती अंतर्गत उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची जी चाचणी केली ती तीनशे किमीपेक्षाही कमी उंचीवरची होती, या चाचणीमुळे होणाऱ्या उपग्रहाच्या तुकडय़ांचा धोका आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला व इतर उपग्रहांना पोहोचू नये यासाठीच ती कमी उंचीवर घेण्यात आली, असे स्पष्टीकरण संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी  केले आहे.

भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीमुळे अवकाश स्थानकाला धोका असल्याचे नासाने अलीकडेच म्हटले होते त्यावर रेड्डी यांनी डीआरडीओ भवन येथे सांगितले की, उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची क्षमता खरेतर १००० कि.मी. उंचीवरील क्षेपणास्त्र नष्ट करण्याची होती. तरी ३०० कि.मी.ची कक्षा निवडण्यामागे या चाचणीतील अवकाश कचऱ्यामुळे अवकाशस्थ मालमत्तांची हानी होऊ नये हा हेतू होता असे त्यांनी स्पष्ट केले.

भारताच्या उपग्रहभेदी चाचणीतून निर्माण झालेला अवकाश कचरा ही महाभयानक गोष्ट असून त्यामुळे अवकाश स्थानकाला धोका निर्माण झाला आहे असे नासाने म्हटले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच याबाबत खुलासा केला असून ही चाचणी वातावरणाच्या कमी उंचीवरील थरात करण्यात आल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांनी भारताची ही चाचणी म्हणजे अभूतपूर्व कामगिरी असल्याचे सांगून भारत हा अवकाश शक्ती बनल्याचे जाहीर केले होते.

व्हाइट हाऊसने कान टोचताच नासाचे घूमजाव

वॉशिंग्टन-नासाचे प्रमुख ब्रायडनस्टाइन यांनी टाऊन हॉल येथील बैठकीत भारताच्या उपग्रहभेदी चाचणीमुळे निर्माण झालेला अवकाश कचरा व त्यामुळे अवकाश स्थानकाला असलेला धोका यावर कडवट टीका केली होती. भारतामुळे ही भयानक समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर व्हाइट हाऊसने नासाच्या टीकेला भारताने मनावर घेऊ नये असे सांगून भारताबरोबरचे संबंध महत्त्वाचे असल्याचे सूचित केले होते. त्यानंतर ब्राइडनस्टाइन यांनी इस्रो प्रमुखांना पत्र पाठवून कठोर भूमिका सोडून मवाळ भाषा वापरत अवकाश कचऱ्याचा मुद्दा गंभीर असला तरी त्याची जबाबदारी अवकाश संशोधन करणाऱ्या देशांवर राहील असे म्हटले आहे. तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोबरोबरचे सहकार्य कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  २७ मार्च रोजी पंतप्रधान मोदी  यांनी उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केल्याचे म्हटले होते. ही क्षमता प्राप्त केलेला अमेरिका, रशिया व चीन यांच्यानतंर भारत हा चौथा देश ठरला आहे.