जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणाऱया घटनेच्या कलम ३७० संदर्भात वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आपल्या घटनेचे ज्ञान नसल्याची टीका पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाने(पीडीपी) केली आहे.
पीडीपी नेते आणि माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद म्हणाले, “जम्मू  काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा घटनेच्या कलमानुसार देण्यात आला आहे. त्यामुळे मोदींच्या म्हणण्यानुसार त्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. मोदींचे अशा प्रकारचे वक्तव्य जम्मू-काश्मीरमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे आहे. कलम ३७० हे कायम राहणार असून ते कधीच हटविले जाणार नाही. त्यामुळे मोदींना घटनेचे ज्ञान नसणे ही खूप गंभीर बाब आहे. जम्म-काश्मीरमध्ये देशाबद्दल विश्वास वाढत असताना मोदींची अशा प्रकारची वक्तव्ये भेद निर्माण करण्याचा उद्देश समोर घेऊन येतात.”
कलम ३७० ही तरतूद राज्याच्या हिताची असेल तर तरतूद रद्द करण्याची मागणी मागे घेता येईल असे नरेंद्र मोदींनी जम्मूत रविवारी झालेल्या सभेत म्हटले होते. या सभेत पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही मोदींच्या भूमिकेशी सहमती दर्शवली होती.