आठ खासदारांच्या निलंबनामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ गोंधळी खासदारांचं निलंबन केलं. त्यामुळेच संतप्त झालेल्या विरोधी बाकांवरच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं.

कृषी विधेयकांवरुन रविवारी राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. विरोधकांची घोषणाबाजी आणि प्रचंड गदारोळात आवाजी मतदान घेऊन आवाजी मतदान घेऊन कृषी विधेयकं मंजूर झाली. राज्यसभेतील विरोधी पक्ष सदस्यांनी वेलमध्ये उतरून केलेली घोषणाबाजी आणि नियमपुस्तिका फाडण्याचा प्रयत्न याची गंभीर दखल घेऊन राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ सदस्यांवर निलंबनाची कारवाई केली. याच कारवाई विरोधात आक्रमक होत विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं.

निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये टीमएमसीचे डेरेक ओब्रियन, डोला सेन, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, काँग्रेसचे राजीव सातव, रिपून बोरा आणि सय्यद नासिर हुसैन, सीपीआय (एम)चे के के रागेश आणि एल्मलारन करीम यांचा समावेश आहे.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही विधेयके रविवारी राज्यसभेत मंजूर झाली. ही विधेयके लोकसभेत आधीच मंजूर झाल्याने कायद्यात रूपांतर होण्यासाठी ती स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली जातील.