संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, रविवारी भाजपने बोलावलेल्या संयुक्त लोकशाही आघाडीच्या (रालोआ) बैठकीकडे शिवसेनेने पाठ फिरवली. त्यामुळे शिवसेना ‘रालोआ’तून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेसोबतची युती तुटल्याने सावध झालेल्या भाजपने घटक पक्षांशी समन्वयाची भूमिका घेतली आहे.

शिवसेना-भाजप युती तुटल्याचे तीव्र पडसाद ‘रालोआ’च्या बठकीत उमटले. त्यामुळे आतापर्यंत ‘रालोआ’च्या समन्वयाला महत्त्व न देणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाने घटक पक्षांसोबतचे मतभेद मिटवण्यासाठी समन्वय साधण्यावर भर देण्याचा निश्चय केला आहे. छोटय़ा छोटय़ा मतभेदांमुळे घटक पक्षांमध्ये विनाकारण अस्वस्थता निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी समिती नेमण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केली.  जनकल्याणासाठी आपण सगळ्यांनी (रालोआच्या घटक पक्षांनी) एकत्र काम केले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी प्रचंड बहुमताने ‘रालोआ’ला विजयी केले आहे. या जनमताचा मान राखला पाहिजे. आपली राजकीय विचारसरणी वेगवेगळी असली तरी सरकार चालवण्याबाबतीत मतभेद नाहीत. छोटय़ा छोटय़ा मतभेदांमुळे अस्थिरता निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. घटक पक्षांमध्ये समन्वय वाढवायला हवा, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.

शिवसेनेची अनुपस्थिती ‘रालोआ’तील सर्वच घटक पक्षांना जाणवली, असे या बठकीला उपस्थित राहिलेले लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी पत्रकारांना सांगितले. शिवसेना हा ‘रालोआ’तील सर्वात जुना घटक पक्ष होता. यापूर्वी तेलुगु देसम आणि नंतर राष्ट्रीय लोकसमता पक्ष ‘रालोआ’तून बाहेर पडले. अशा रीतीने घटक पक्षांनी वेगळी वाट धरणे चिंतेची बाब आहे. मात्र, यापुढे घटक पक्षांमध्ये अधिक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी समन्वयकही नेमण्याची मागणी केल्याचे चिराग पासवान यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘रालोआ’ची बठक झाली असली तरी या बwठका नियमित होण्याची गरज आहे, असेही पासवान यांनी सांगितले.

शिवसेना विरोधी बाकांवर

* शिवसेना ‘रालोआ’तून बाहेर पडली असल्याने आता शिवसेनेचे खासदार विरोधी बाकांवर बसतील, असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना सांगितले.

* शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याने आता ते लोकसभेत पहिल्या रांगेऐवजी तिसऱ्या रांगेत बसतील.

* दोन्ही सभागृहांमध्ये शिवसेनेच्या खासदारांची आसनव्यवस्थाही बदलली जाईल, असे जोशी यांनी स्पष्ट केले.

आजपासून हिवाळी अधिवेशन : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. आर्थिक मंदीसदृश स्थिती, काश्मीर, नागरिकत्व विधेयक आदी मुद्दय़ांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची चिन्हे आहेत.  फारूख अब्दुल्ला यांना संसदेत उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची मागणी सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी  केली. सर्व मुद्दय़ांवर चर्चा करण्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शवली आहे