लडाखमध्ये सुरु असलेल्या भारत-चीन सीमावादात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही असे चीनने म्हटले आहे. काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर २५ मिनिटे चर्चा झाली. त्यात लडाखमध्ये सुरु असलेल्या सीमा वादावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर आज चीनने तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचे म्हटले आहे.

मागच्या आठवडयात डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन अमेरिका भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करायला तयार असल्याचे म्हटले होते. ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये काल सकारात्मक चर्चा झाली. लडाखमध्ये भारत-चीनमध्ये सुरु असलेला सीमावाद, करोना व्हायरसमुळे निर्माण झालेले संकट आणि जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा या मुद्दांवर दोन्ही नेत्यांमध्ये बोलणे झाले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये लडाखच्या विषयावरुन झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले की, ‘असे विषय सोडवण्यासाठी दोन्ही देशांकडे यंत्रणा आहे. आता सीमेवरील स्थिती नियंत्रणात आहे’. “भारत आणि चीन दोन्ही देशांकडे सीमावाद सोडवण्यासाठी यंत्रणा आहे. चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून वाद सोडवण्याची आमची क्षमता आहे. तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले.

निमंत्रणासाठी केला होता फोन
ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या G 7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. डोनाल्ड ट्रम्प यांना G 7 देशांच्या संघटनेचा विस्तार करायचा आहे. त्या दृष्टीने ट्रम्प यांनी उचलले हे पाऊल आहे. जगातील महत्वाच्या अर्थव्यवस्थांना G 7 मध्ये प्रतिनिधीत्वाची संधी देण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.