भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर चिडलेल्या पाकिस्तानने आता भारतीय चित्रपट आणि जाहिराती पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास निर्बंध आणले आहेत.


पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी म्हटले की, पाकिस्तानातील सिनेमा एक्झिबिटर्स असोसिएशनच्यावतीने भारतीय सिनेमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाहीत.

त्याचबरोबर भारतात निर्मित झालेल्या जाहीरातींवरही बंदी घालण्यात यावी, अशा सूचना पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलॅटरी अथॉरिटीला (पीईएमआरए) देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारताचे ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. पाकिस्तानस्थित जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने आज (दि.२६) बरोबर बाराव्या दिवशी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानाच्या खैबर पख्तून या प्रांतात घुसून ‘जैश’च्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यामध्ये सुमारे ३५० दहशतवादी मारले गेले.