चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा इशारा

आर्थिक सुधारणांच्या मार्गाने आम्ही चालत राहू पण आम्ही काय करावे हे कुणी सांगण्याचा प्रयत्न करू नये, असा कडक इशारा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी मंगळवारी दिला.

कम्युनिस्ट पक्षाने खुल्या आर्थिक धोरणाची चाळिशी साजरी केली. त्यावेळी ग्रेट हॉल ऑफ पीपल येथे जिनपिंग यांनी सांगितले की, आम्ही आर्थिक सुधारणा पुढे नेऊ पण आमचा देश एक पक्षीय पद्धतीपासून दूर जाणार नाही व दुसऱ्या कुठल्या देशाचे आदेश जुमानणार नाही. त्यांचा रोख अमेरिकेवर होता. चीनने कुठल्याही देशाला धोका निर्माण केलेला नाही पण आम्हाला कुणी दडपण्याचा प्रयत्न करू नये. डेंग झियाओ पेंग यांनी डिसेंबर १९७८ मध्ये सुरू केलेल्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांवर चीन मागे हटणार नाही पण कुणाचा हस्तक्षेप सहन करणार नाही. जे बदलता येते ते आम्ही बदलू, जे बदलणे शक्य नाही व आवश्यक नाही ते बदलणार नाही.

चीनच्या कंपन्यांना युरोप व अमेरिकेत मुक्त वाव असताना अमेरिका व युरोपीय कंपन्यांना मात्र चीनमध्ये खुलेपणाने प्रवेश दिला जात नाही, खुल्या पाश्चिमात्य बाजारपेठेचे फायदे घेणाऱ्या चीनने इतरांना बाजारपेठ पूर्ण खुली केली नाही अशी टीका होत आहे.

जिनपिंग म्हणाले की, मुक्त जागतिक अर्थव्यवस्थेचा आम्ही पुरस्कार करतो. एकाधिकारशाही व शक्तीच्या राजकारणाला आमचा विरोध आहे. चीन जगातील परिप्रेक्ष्यात मध्यवर्ती स्थानावर येत असून जागतिक शांततेचा पुरस्कर्ता अशी त्याची ओळख आहे. जागतिक विकासात चीनचा मोठा वाटा असून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा चीन हा समर्थक आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारयुद्धात सध्या ९० दिवसांचा समझोता  झाला आहे, त्यामुळे तूर्त एकमेकावंर कर लादण्याच्या घोषणा थांबल्या आहेत.

देशाच्या विकासात मोठे योगदान असलेल्या शंभर व्यक्तींना मंगळवारी पदके प्रदान करण्यात आली, त्यात अलिबाबाचे संस्थापक जॅक मा, एनबीएचे निवृत्त प्रमुख याव मिंग यांचा समावेश होता. चीनमध्ये मुक्त धोरणानंतर दारिद्रय़ कमी झाले असून ४० वर्षांपूर्वी दारिद्रय़ाचे प्रमाण ९७.५ टक्के होते ते गेल्या वर्षीपर्यंत ३.१ टक्के झाले आहे.