News Flash

शिकण्यासाठी कशाला हवी जात आणि धर्म?

१ लाख २४ हजार विद्यार्थ्यांनी धर्म, जातीचा रकाना सोडला मोकळा

प्रातिनिधिक छायाचित्र

केरळ राज्यातील जवळपास १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेताना प्रवेश अर्जावरील धर्म आणि जातीच्या रकान्यात आपला धर्म आणि जात नमूद न करता तो रिकामा सोडला आहे. विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे शिक्षण मंत्री सी रविंद्रनाथ यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे. यावर्षी अनेक शाळांतील प्रवेश अर्जावर एकूण १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांनी हा रकाना न भरताच पुढील प्रक्रियेसाठी पाठवून दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. ही चांगली बाब असून पालक धर्मनिरपेक्षतेकडे वळत असल्याचं रविंद्रनाथ यांनी सांगितलं.

राज्यात असे किती विद्यार्थी आहेत जे दाखला घेताना प्रवेश अर्जावर आपली जात आणि धर्म नमूद करत नाहीत, यासंदर्भात प्रश्न रविंद्रनाथ यांना विचारला होता. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील ९ हजार शाळांमधून ही माहिती गोळा करण्यात आली होती. पहिली ते दहावीच्या वर्गातील १ लाख २४ हजार विद्यार्थी कोणताही धर्म किंवा जात मानत नाही. ते प्रवेश अर्जावरील रकाना रिकामाच ठेवत असल्याचं गोळा केलेल्या माहितीद्वारे निदर्शनास आलं आहे. धर्म आणि जातीचे रकाने न भरताच ते रिकामे सोडण्याकडे अनेक विद्यार्थी आणि पालकांचा कल वाढत आहे. ते न भरणाऱ्यांची संख्या वर्षागणिक वाढतच चालली आहे. ही बाबदेखील त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

ही आकडेवारी समोर आल्यानंतर केरळमधल्या अनेक राजकारणी आणि लेखकांनी यांचं कौतुक केलं आहे. विद्यार्थी जातीयवादाला भीक न घालता नवी विचारसारणी आत्मसात करत आहेत, विद्यार्थी धर्मनिरपेक्ष होत आहे. राज्यात बदलाचे वारे वाहत आहेत ही नक्कीच चांगली बाब आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2018 10:24 am

Web Title: over one lakh students leave caste religion columns blank during school admission in kerala
Next Stories
1 फेकन्युज : मोफत बुटांच्या
2 परदेशात मॅकडीमध्ये कागदी स्ट्रॉ, भारतात कधी?
3 …म्हणून खास आहे हुकूमशहा किम जोंग उनची गडद हिरव्या रंगाची ट्रेन
Just Now!
X