दिल्लीच्या प्राणावायूच्या गरजेबाबत आपण सादर केलेला अहवाल अंतरिम होता आणि प्राणवायूची गरज दररोज बदलत असते, असे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

दिल्लीची प्राणवायूची गरज किती आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुलेरिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती, त्या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर वाद निर्माण झाला होता त्यावर गुलेरिया यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीच्या प्राणवायूच्या गरजेचे प्रमाण वाढवून सांगण्यात आले होते, असा अहवाल गुलेरिया यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या समितीने सादर केला होता.

मात्र हा अहवाल अंतरिम होता, प्राणवायूची गरज दररोज बदलत असते, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे. या अहवालानंतर भाजपने दिल्लीतील आप सरकारवर गुन्हेगारी निष्काळजीपणाचा आरोप केला होता.

…तर करोनाचा विजय- केजरीवाल

नवी दिल्ली : करोनाच्या पुढील लाटेत प्राणवायूचा तुटवडा भासणार नाही यासाठी प्रत्येकाने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी केले. आपण असेच संघर्ष करीत राहिलो तर करोनाचा विजय होईल, असेही ते म्हणाले. करोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीच्या प्राणवायूच्या गरजेबाबत अतिशयोक्ती करण्यात आल्याचा अहवाल आल्यानंतर आम आदमी पार्टी आणि भाजपने एकमेकांना दूषणे दिली होती, त्यानंतर केजरीवाल यांनी वरील आवाहन केले. प्राणवायूवरून सुरू असलेला संघर्ष संपला असेल तर आपण काम सुरू करू या,  असे केजरीवाल यांनी ट्वीट केले आहे.