हिवाळा सुरु होण्याआधी पाकिस्तानकडून शक्य तितके दहशतवादी भारतात घुसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण भारतीय लष्कराच्या दहशतवाद विरोधी युनिटसनी त्यांचे सर्व प्रयत्न उधळून लावले आहेत, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

“दहशतवादी घुसवण्याची आपली सवय पाकिस्तान सोडणार नाही. हिवाळा सुरु होण्याआधी पाकिस्तान शक्य तितक्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीला प्रोत्साहन देणार. पण त्यांची योजना धुळीस मिळवण्यासाठी आपली दहशतवादविरोधी यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे. सुरक्षा दलांनी मोठया प्रमाणावर दहशतवाद्यांचा खात्मा केलाय, त्यावरुन हे दिसून येते. LOC वर त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत” असे मनोज मुकुंद नरवणे म्हणाले. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

२४ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान सुरक्षा दलांकडून एकूण १७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात तीन परदेशी दहशतवादी होते. १४ ऑक्टोबर रोजी तांगधर सेक्टरमध्ये सतर्क असलेल्य जवानांनी पाकिस्तानच्या बॅट फोर्सचा हल्ल्याचा प्रयत्न विफल केला. तीन ते चार सशस्त्र घुसखोर फॉरवर्ड पोस्टच्या दिशेने येत असल्याचे दिसताच, जवानांनी तात्काळ कारवाई केली.