चंडीगड : ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाला हानिकारक ठरणारी विधाने करणारे पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचे खाते बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी घेतला आहे. स्थानिक स्वराज्य प्रशासन खाते सिद्धू यांच्याकडे असून  त्यांनी ते अकार्यक्षमपणे चालवल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, सिद्धूने शीख धर्मग्रंथाच्या कथित विटंबना प्रकरणात जी विधाने केली त्यामुळे काँग्रेस पक्षच अडचणीत आला होता. २०१५ मध्ये धार्मिक ग्रंथाची विटंबना झाल्याच्या प्रकरणात सिद्धू यांनी प्रश्न उपस्थित केले होते. सिद्धू यांच्या वक्तव्यामुळे भटिंडा येथे काँग्रेसच्या यशावर परिणाम झाला आहे. सिद्धू यांनी कुठलीही विकासकामे केलेली नसून त्याचा फटका काँग्रेसला शहरी भागात काही प्रमाणात बसला आहे. सिद्धू यांचे खाते बदलण्याचा आपला विचार असून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालवण्यात अपयश आहे. शीख धर्मग्रंथाच्या विटंबनेचे प्रकरण जुने म्हणजे २०१५ मधील असून तो मुद्दा विधानसभा निवडणुकीत उपस्थित करण्याचे कारण नव्हते तरी त्यांनी तो उपस्थित केला याबाबत पक्षश्रेष्ठींकडे दाद मागण्यात येणार आहे. या प्रकरणी विशेष चौकशी पथक नेमण्यात आलेले असताना सिद्धू यांना त्याची माहिती नसावी हे कोडेच आहे.