लागोपाठ सुरू असणारे परदेश दौरे असो किंवा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लावलेला सभांचा धडाका असो, अशा प्रत्येकवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण न थकता कितीही तास करू शकतो, हे दाखवून दिले आहे. आता त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांनाही हाच कित्ता गिरवण्याचे आवाहन केले आहे. ‘चले जाव’ चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशभरातील सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजे २०२२ सालापर्यंत आरोग्य, शिक्षण, रस्ते, गरिबी निर्मुलन यासारख्या क्षेत्रांमध्ये ठोस बदल दिसून येणे अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी अधिक निष्ठेने काम करण्याची गरज आहे. हे सांगताना पंतप्रधान मोदींनी सरकारी अधिकाऱ्यांना एक आवाहन केले. मी तुम्हाला शाश्वती देतो की, तुम्ही जितके जादा तास काम कराल, मी त्याच्यापेक्षा एक तास अधिक काम करून दाखवेन. लोकांकडे फायद्याचे साधन म्हणून बघू नका, तर त्यांच्याकडे मी सांगितलेल्या उद्दिष्टपूर्तीतील एक सहकारी म्हणून बघा. त्यासाठी लोकांपर्यंत जाऊन त्यांना मदत आणि सहकार्य करा, असे मोदींनी सांगितले. या कार्यक्रमाला फक्त सरकारी अधिकाऱ्यांनाच प्रवेश होता. त्यांच्यापैकी काहींनी पंतप्रधान मोदींचे भाषण प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आता इस्त्रायली श्वानपथक

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विशिष्ट अशा मुद्द्यावर भाष्य केले नाही. मात्र, फाईल्सच्या जंजाळात गुंतून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करा, असा सल्ला दिला. जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना आणि उद्योगपतींनी वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) फायदे समजावून सांगितले पाहिजेत. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी विकासाची मशाल कायम तेवत ठेवली पाहिजे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात रिले शर्यतीप्रमाणे विकासाची मशाल एका अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिली गेली पाहिजे. तरच आपण या शर्यतीत जिंकू, असे मोदींनी सांगितले. याशिवाय, लवकरच सरकारकडून ‘न्यू इंडिया. इन’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात येईल. या संकेतस्थळावर सरकारच्या पाच वर्षातील कामांची माहिती देणाऱ्या ‘संकल्प से सिद्धी’ योजनेविषयी लोकांना जाणून घेता येईल, असेही मोदींनी सांगितले.