दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणाऱ्या आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरच शरसंधान केले आहे. राहुल गांधी हे भ्रष्ट असल्याने ‘आप’ त्यांच्याविरुद्ध त्याचप्रमाणे यूपीए सरकारमधील मंत्री आणि अन्य पक्षांच्या नेत्यांविरुद्ध निवडणुकीत उमेदवार उभे करील, असे ते म्हणाले.
केजरीवाल यांनी राहुल गांधी यांच्यासह भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. स्वत:ची आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या नावांची यादी तयार करण्यात आली असून आप त्यांच्याविरुद्ध उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या यादीत गांधी यांच्यासह यूपीए सरकारमधील मंत्री, सपाचे नेते मुलायमसिंग, पी. चिदम्बरम, सुशीलकुमार शिंदे, भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांचा समावेश करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अप्रामाणिक राजकीय नेत्यांच्या नावांची यादी आपण तयार केली आहे, त्यापैकी कोणी प्रामाणिक असल्याची आपली माहिती असेल तर त्याबाबत आपल्याकडे स्पष्टीकरण द्यावे, असे केजरीवाल यांनी आपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.