चार जणांनी महिलेवर बलात्कार करणे व्यावहारिकदृष्टय़ा शक्य वाटत नाही, एखाद्या व्यक्तीने बलात्कार केला तरी इतर चार जणांची नावे ही केवळ वैमनस्यातून घेतली जातात, असे वादग्रस्त मत समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांनी व्यक्त केले. एक प्रकारे मुलायमसिंह यांनी सामूहिक बलात्कार शक्य नसतो असे सांगून या प्रकरणांमध्ये न्यायालयांनी दिलेल्या निकालांचाही अवमान केला आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यांनी बलात्काराबाबत अशी विधाने करण्याची ही पहिली वेळ नाही, गेल्या वर्षी त्यांनी बलात्काऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याला विरोध केला होता. ‘लडके, लडके हैं गलती  हो जाती हैं’ असे त्यांनी म्हटले होते. कायदा व सुव्यस्थेबाबत एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की उत्तर प्रदेशची लोकसंख्या पाहता गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. अनेकदा एकाच व्यक्तीने बलात्कार केलेला असतो पण वैमनस्यातून चार व्यक्तींची नावे घेतली जातात. निरपराध व्यक्तींना अशा प्रकरणांमध्ये गुंतवून छळणे चुकीचे आहे, एका महिलेने चार भावांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे ते शक्य वाटत नाही. बदाऊन येथे दोन बहिणींवर बलात्कार व खुनाच्या घटनेला प्रमाणापेक्षा जास्त वाढवण्यात आले. सीबीआय चौकशीत त्या बहिणींवर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मालमत्तेच्या वादातून त्या बहिणींचा त्यांच्या चुलतभावांनीच खून केला होता. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल गांधी बदाऊन येथे आले होते व राज्य सरकारवर कायदा व सुव्यवस्थेबाबत टीका केली होती.
मुलायमसिंहांचे विधान हे महिलांचा अपमान करणारे आहे व सामूहिक बलात्कारांबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालांवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे अशी टीका भाजपने केली आहे.