करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका आर्थिक फळीमध्ये खालच्या स्तराला असणाऱ्यांना बसला आहे. हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. मागील काही दिवसांमध्ये आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाणही वाढलं आहे. तर अचानक रोजगार गेल्याने काहींवर मानसिक परिणाम झाला आहे. झारखंडमधील सरायकेला येथील एका तरुणालाही अशाप्रकारे रोजगार बुडाल्याने प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. वयोवृद्ध आई-बापाची जबाबदारी असणाऱ्या या मुलाचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. मात्र सध्या कुटुंबाकडे या मुलावर उपचार करण्याइतका पैसाही उपलब्ध नाहीय.

सरायकेला जिल्ह्यातील राजनगर येथील मुडिया पारा गावात राहणाऱ्या हेमंत कुमार मोदक असं या तरुणाचं नाव आहे. हेमंतचे राजनगरमधील साहू कॉलीनी येथे एक इलेक्ट्रॉनिक्सचं छोटं दुकान होतं. तो लहान मोठं इलेक्ट्रीक सामान विकायचा आणि घरातील छोट्या मोठ्या इलेक्ट्रीकल वस्तुंच्या दुरुस्तीचं काम करायचं. यामधून होणाऱ्या कमाईवर त्याचे घर चालायचे. मात्र करोनामुळे हेमंतचे दुकान बंद झालं आणि कुटुंब आर्थिक संकटामध्ये सापडलं. मात्र सतत आर्थिक परिस्थिती आणि आई-वडीलांच्या काळजीमुळे हेमंतचे मानसिक संतुलन बिघडलं.

मार्च महिन्यामध्ये दुकान बंद झाल्यानंतर हेमंतची मानसिक परिस्थिती दिवसोंदिवस बिघडत गेली. तो वेडेवाकडे हावभाव करुन येणाऱ्या जाणाऱ्यांना चिडवू लागला. त्यानंतर त्याला आता सतत उभं राहण्याचा विचित्र मानसिक आजार झाला आहे. तो एखाद्या मूर्तीप्रमाणे तासनतास एकाच ठिकाणी उभा राहतो. त्याला ऊन, पाणी, उष्णता याचा काहीच परिणाम होत नसल्यासारखा तो एकाच ठिकाणी अनेक तास उभा राहतो. सतत उभं राहिल्याने त्याच्या पायांनाही सूज आली आहे. स्थानिकांनी हेमंतवर उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र त्याचा फारसा फायदा झाला आहे. आपल्या एकुलत्या एका मुलाची ही परिस्थिती बघून आई-बाप दु:खी आहेत. मुलावर उपचार करण्याइतकेही पैसे त्यांच्याकडे नाहीत.

जिल्हाच्या आरोग्य विभागाने हेमंतची दखल घेतली असून त्याच्यावर उपचार करण्यात येतील असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. यासंदर्भात ‘न्यूज १८ हिंदी’शी बोलताना सिव्हील सर्जन असणाऱ्या डॉ. हिमांशु भूषण बरवार यांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर डॉक्टरांनी हेमंतची तपासणी केल्याची माहिती दिली आहे. हेमंतला सिजियोफ्रेमिक मेंटल डिसॉर्डर हा मानसिक आजार झाला आहे. या आजारावरील उपचार करण्यासाठी हेमंतला रांचीला पाठवण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने मुलाची दखल घेतल्याने हेमंतच्या पालकांनी समाधान व्यक्त केलं आहे.