CAA आणि NRC विरोधातील आंदोलनात आपल्या भडकाऊ भाषणामुळे चर्चेत आलेल्या शरजील इमामविरोधात दिल्ली पोलिसांनी साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. चिथावणीखोर भाषण देऊन हिंसा घडवल्याचा आरोप शरजीलवर ठेवण्यात आलेला आहे. दिल्ली पोलिसांनी २८ जानेवारी रोजी शरजीलला बिहारच्या जहानबादमधून अटक केली होती. यानंतर तब्बल दोन-अडीच महिन्याच्या कालावधीनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे.

CAA आणि NRC विरोधातील आंदोलनात शरजीलचं एक भाषण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. १५ डिसेंबर २०१८ रोजी जामिया मिलीया येथे शरजील एक चिथावणीखोर भाषण केलं होतं. ज्यात इशान्येकडील राज्य भारतापासून तोडण्याची भाषा वापरण्यात आली होती. याच भाषणाचा आधार घेत दिल्ली पोलिसांनी शरजील विरोधात हिंसा घडवण्यास कारणीभूत आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. CAA विरोधातील आंदोलनादरम्यान अलिगढ मुस्लिम विद्यापीठात हिंसाचार झाला होता, यावेळी शरजीलने चिथावणीखोर भाषण केलं होतं.

कोण आहे शरजील इमाम??

शरजील हा बिहारमधील जहानबादचा रहिवासी आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीजमध्ये तो शिक्षण घेत आहे. याव्यतिरीक्त त्याने IIT Bombay मधून कंप्यूटर सायन्स या विषयात पोस्ट ग्रॅज्युएनशनही केलं आहे.