News Flash

“काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही”; शिवसेनेचा ओवेसींवर निशाणा

राम मंदिराच्या भूमिपूजनावरून ओवीसींनी केली होती टीका

अयोध्येत भव्यदिव्य राममंदिर उभारणीच्या कार्यास प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी रामदर्शन घेतले व साष्टांग असे दंडवत घातले. संकटाच्या चक्रव्यूहातून रामजन्मभूमी मुक्त झाली असे पंतप्रधान म्हणाले. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी अयोध्येतील सोहळ्याचे स्वागत केले आहे, पण काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही. अर्थात यात नेहमीप्रमाणे असदुद्दीन ओवेसी हेच आघाडीवर आहेत, असं म्हणत शिवसेनेनं ओवेसी यांच्या वक्तव्याच्या समाचार घेतला.

अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. “अयोध्येत पंतप्रधान जसे भावनिक झाले तसा मीदेखील भावनिक झालो आहे,” असं ओवेसी म्हणाले होते. दरम्यान, शिवसेनेनं ओवेसी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ओवेसी म्हणतात, ‘‘बाबर जिंदा है। जिंदा रहेगा।’’ ओवेसी यांनी ही जी बांग दिली ते त्यांचे ‘स्वगत’ आहे. या स्वगताचे देशातील मुसलमान बांधवांनी स्वागत केले नाही, असं म्हणत शिवसेनेनं ओवेसी यांना धारेवर धरलं. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हटलंय अग्रलेखात?

मोगलांच्या आक्रमणात हिंदूंचे स्वामित्व काही काळ लयास गेले, पण म्हणून त्यांचे अस्तित्वच संपले असे होत नाही. बाबराने रामजन्मभूमीचा विध्वंस केला व तेथे मशीद उभारली हे ओवेसींसारखे नेते का स्वीकारीत नाहीत? ओवेसी हे कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी आणखी एका मुद्द्यावर बांग दिली आहे. ते म्हणतात, ‘‘हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे राममंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहून मोदींनी संवैधानिक शपथ मोडली आहे. आजचा दिवस म्हणजे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची हार असून हिंदुत्वाचा विजय आहे!’’ ओवेसी यांच्या बोलण्यात तथ्य नाही.

ते वातावरणात गरमी आणू पाहत आहेत, पण आता ते शक्य नाही. मुळात स्वतः ओवेसी तरी खरे निधर्मी आहेत काय याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. अयोध्येतील भूमिपूजन हा हिंदुत्वाचा विजय असल्याचे शल्य ओवेसी यांनी बोलून दाखवले. हिंदुस्थानात बहुसंख्य हिंदूंच्या भावनांचा आदर करणे ही लोकशाहीच आहे. त्या भावनांचा आदर करून राममंदिर उभे करणे यात निधर्मीवादाचा पराभव असल्याचे ओवेसी यांना वाटते. पाकिस्तानातील काही नेत्यांनादेखील तसेच वाटते.

ओवेसी म्हणतात, मोदी यांनी अयोध्येत केलेले मंदिराचे भूमिपूजन असंवैधानिक आहे. श्रीमान ओवेसी, कोणत्या संविधानाच्या गोष्टी आपण करीत आहात? देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराबाबत निर्णय दिला. म्हणजे संविधानाचा आदर ठेवूनच अयोध्येत पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आहे. हिंदुत्व हे सगळ्यात जास्त निधर्मी आहे. कारण ते देशाचे संविधान व न्यायालयाचा आदर करते. हिंदू धर्माचे स्वतःचे वेगळे ‘शरीयत’ नाही व इतर धर्मीयांना तो ‘काफर’ समजत नाही. राममंदिर हे त्याच संविधानाचे राष्ट्रीय प्रतीक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 7:34 am

Web Title: shiv sena saamna editorial criticize mim leader asaduddin owaisi ram mandir bhoomi pujan pm narendra modi babri masjid jud 87
टॅग : Ram Mandir,Ram Temple
Next Stories
1 चिनी ‘अतिक्रमणाची’ कबुली देणारा दस्तऐवज नाहीसा
2 पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेसमध्ये धुसफूस
3 करोना चाचणी प्रयोगशाळांमध्ये वाढ
Just Now!
X