माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आसामचे प्रतिनिधित्व केले असताना अद्यापही आसामला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याची टीका केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.
डॉ. मनमोहन सिंग हे दोनदा आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांनी सलग १० वर्षे पंतप्रधानपद भूषविले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आसामला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे ते व्हावयास नको होते, असेही इराणी यांनी म्हटले आहे.
गेल्या सहा दशकांच्या कालावधीत सत्ता असूनही काँग्रेसने आसामसाठी विशेष काही केले नाही. मात्र भाजप सरकारने गेल्या दीड वर्षांत जी विकासात्मक पावले उचलली आहेत ती सर्वासमोर आहेत, असेही त्या म्हणाल्या. यंदाचे वर्ष आसामसाठी निर्णायक आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आसाममध्ये ‘कमळ’ फुलेल, राज्यात बदल घडतील आणि विकास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.