दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, असा सल्ला योगगुरु रामदेवबाबा यांनी दिला आहे. अशा लोकांना अन्य सरकारी योजनांसाठीही अपात्र ठरवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे बुधवारी पतंजलीच्या शोरुमचे उद्घाटन रामदेवबाबा यांच्या हस्ते करण्यात आले. पतंजलीचे हे कपड्याचे शो रुम आहे. याप्रसंगी रामदेवबाबा म्हणाले, आम्ही सात लाख कोटींच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली असून ७० वर्षानंतर आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवले पण देशाला अजूनही आर्थिक स्वातंत्र्य मिळालेले नाही. यासाठीच आम्ही मैदानात उतरुन काम करतोय, असे त्यांनी सांगितले.

लोकसंख्या नियंत्रणासाठी रामदेवबाबांनी उपाय देखील सांगितला. जर एखाद्याला दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर त्याचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा आणि त्याला अन्य सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरवावे, असे रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मी राजकारणाला आयुष्यातून डिलीट केले आहे. देशाच्या राजकारणात सध्या युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूंनी दिग्गज मैदानात उतरले आहेत. जय- पराजय हा कोणाचाही होऊ शकतो, पण ही निवडणूक रंगतदार असेल. राजकीय पक्षांनी देशाच्या विकासावरही भाष्य केले पाहिजे. पण दुर्दैवाने सध्या राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त असून राजकारणातील मर्यादांचा त्यांना विसर पडला आहे. प्रियंका गांधी यांचा सक्रीय राजकारणातील प्रवेश हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले आहे.