इराकमधील वांशिक हिंसाचाराने व्यथित झालेले भारतीय अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी इराकच्या वरिष्ठ धार्मिक नेत्यांची अमेरिकेत भेट घेतली. त्यांनी सांगितले, की या प्रश्नावर संवादाचा मार्ग हाच शाश्वत ठरू शकतो व त्यामुळे हा प्रश्न सुटेल.
आर्ट ऑफ लिव्हिंग रिट्रिट या उत्तर कॅरोलिनातील निसर्गरम्य ठिकाणी रविशंकर यांनी इराकच्या दोन शिया नेत्याशी चर्चा केली. सुन्नी नेत्यांशीही चर्चा करण्याचा त्यांचा इरादा आहे. स्काइपद्वारे ते चर्चा करतील किंवा युरोपला जाऊन त्यांच्याशी चर्चा करतील. इराकी धार्मिक नेत्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
रविशंकर यांनी सांगितले, की इराकमध्ये संघर्ष करणाऱ्या शिया व सुन्नी पंथीयांमध्ये सलोखा घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
यात अध्यात्मिक गुरूंना मध्यस्थी करण्याची संधी आहे व आपण हिंसाचार करणाऱ्या गटांना तो थांबवण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. केवळ राजकीय मार्गाने शांतता नांदते असे नाहीतर प्रत्यक्ष समोरासमोर चर्चेने प्रश्न सुटू शकतात, त्यासाठी विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल असे ते म्हणाले. त्यांनी भारतातील मुस्लिम धार्मिक नेत्यांशीही याबाबत काय करता येईल याची चर्चा करता येईल.
संवाद सुरू करून सध्याचा हिंसाचार थांबवा असे त्यांनी इराकच्या धार्मिक नेत्यांना सांगितले. या शांतता चर्चेत शिया नेते सय्यद महंमद अल अत्तार सहभागी होते. त्यांनी सांगितले, की शिया लोकांना इराकमध्ये शांतता हवी आहे व सुन्नी लोकांबरोबर सलोखा हवा आहे, त्यासाठी रविशंकर यांनी धार्मिक नेत्यांनी सर्व धार्मिक नेत्यांमध्ये मध्यस्थी करावी. रविशंकर यांची ही चांगली शांतता मोहीम आहे असे अत्तार यांनी सांगितले. या वेळी व्हर्जिनिया येथील इमाम अली सेंटरचे शेख मुस्तफा अखनौद उपस्थित होते. अल अत्तार यांनी सांगितले, की सुन्नी लोकांना सरकारमध्ये व राजकीय व्यवस्थेत पुरेसे प्रतिनिधित्व आहे, पण त्यांना सत्तेवर पूर्ण ताबा हवा आहे व तो लोकशाही मार्गानेच त्यांना मिळवता येईल, हिंसक मार्गाने किंवा वंश निर्दालन करून त्यांनी काही करू नये व सध्या इस्लामी अतिरेकी तेच करीत आहेत. त्यांनी संवाद सुरू केला नाहीतर देशाची स्थिती बिघडू शकते.
रविशंकर यांनी सांगितले, की संवाद सुरू केला नाहीतर परिस्थिती बिघडेल यात शंकाच नाही. दोन्ही बाजूंबाबत आम्ही तटस्थ आहोत, त्यामुळे आम्ही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
रविशंकर यांच्या द आर्ट ऑफ लिव्हिंगची थोडी केंद्रे इराकमध्ये असून शंभरावर शिक्षक तेथे साधना शिकवत आहेत.