कर्नाटकमध्ये सत्तेचा तोंडचा घास भाजपाने पळवल्याचं चित्र असताना राहुल गांधींनीही भाजपावर अत्यंत तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी गुरूवारी दोन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर पोहोचले. राजधानी रायपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधींनी मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

भाजपा ज्या परीवाराचा सदस्य आहे, त्यांची मुख्य संस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा RSS देशातील सर्व संस्थांमध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप गांधींनी येथील सभेत बोलताना केला. संघाच्या या कृत्याची तुलना केवळ पाकिस्तान अथवा तत्सम हुकुमशाही असलेल्या देशांमध्येच होऊ शकते असं सांगत मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा पाकिस्तान होत असल्याची टीका त्यांनी केली आहे. कर्नाटक निवडणुकांवरुनही निशाणा साधताना देशात भयावह वातावरण आहे, देशाच्या घटनेवर सातत्याने हल्ला केला जातोय, असं राहुल म्हणाले.

रायपूरमध्ये जन स्वराज संमेलनात बोलताना राहुल यांनी केंद्रातील मोदी सरकार हुकुमशहाप्रमाणे काम करत असल्याचा आरोप केला. आरएसएस देशातील सर्व संस्थांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे, तर भाजपा संस्थांचा खून करतंय असं विधान राहुल यांनी केलं. भाजपाला देशातील गरीब जनतेचा आवाज ऐकायचा नाहीये, ते महिला आणि दलितांच्या बाजूचे नाहीत. जनता न्यायाच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाते, पण ७० वर्षात देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना आपली बाजू मांडण्यासाठी जनतेच्या समोर यावं लागलं, असं राहुल म्हणाले.

छत्तीसगड दौऱ्यात राहुल गांधी शेतकरी, आदिवासी आणि समाजापासून दुरावलेल्या घटकांची भेट घेतील अशी माहिती काँग्रेसचे छत्तीसगड प्रभारी पीएल पूनिया यांनी दिली.