बिहारमध्ये नितीश कुमार यांचे सरकार स्थापन झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी(आज) त्यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांनी राजीनामा दिला. नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप असल्याने राजदने यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. शिवाय, लालू प्रसाद यादव यांनी देखील मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपावर टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिक्षणमंत्री मेवलाल चौधरी यांनी पदभार स्वीकारल्याच्या तासाभरातच शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने, बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर, यावरून आता राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

”मी म्हटलं होतं ना तुम्ही थकला आहात, त्यामुळे तुमची विचार करण्याची समजण्याची शक्ती क्षीण झाली आहे. मुद्दाम भ्रष्टाचाऱ्यास मंत्री बनवले. टीका होत असतानाही पदभार दिला व तासाभरातच राजीनाम्याचं नाटक रचलं. खरे गुन्हेगार तुम्ही आहात, तुम्ही मंत्री का बनवलं? तुमचा दुटप्पीपणा व नाटक आता चालू दिलं जाणार नाही?” असा तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना टोला लगावत इशारा दिला आहे.

तसेच, ”मुख्यमंत्री महोदय, जनादेशाच्या माध्यमातून बिहारने आम्हाला एक आदेश दिला आहे की, तुमच्या भ्रष्ट नीती, हेतू व नियमांविरोधात तुम्हाला चेतावणी देत रहा. केवळ एका राजीनाम्याने होणार नाही, आता तर १९ लाख नोकऱ्या, करार आणि समान काम – समान वेतनासारखे अनेक सार्वजनिक मुद्यांवरून भेट होत राहील. जय बिहार, जय हिंद..” असं देखील तेजस्वी यादव यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

मेवलाल चौधरींनी दिलं आरोपांना उत्तर –
दरम्यान, मंत्रीपदाचा राजीनामा देताना मेवालाल चौधरी यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तरही दिले आहे. कोणताही खटला तेव्हा सिद्ध होतो, जेव्हा तुमच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे किंवा न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. माझ्या विरोधात आरोपपत्रही नाही आणि गुन्ह्याची नोंदही झालेली नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

लालू प्रसाद यादव यांनी केली होती टीका –
या अगोदर या अगोदर बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजदचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी देखील, सहायक प्राध्यपक नियुक्तीत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीस शिक्षणमंत्री बनवण्यात आल्यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपावर निशाणा साधला होता. ”दुर्देवं पहा जे भाजपावाले कालपर्यंत मेवालालचा शोध घेत होते, आज मेवा मिळाताच त्यांनी मौन बाळगलं आहे.” असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं होतं.
तसेच, तेजस्वी जिथं पहिल्याच कॅबिनेटमध्ये पहिल्या स्वाक्षरीनिशी १० लाख नोकऱ्या देण्यासाठी कटिबद्ध होते. तिथं नितीश यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये नियुक्तीत घोटाळा करणाऱ्या मेवालाल यांना मंत्री बनवून आपली प्राथमिकता दर्शवली आहे आहे. असा टोलाही लालू प्रसाद यादव यांनी लगावला होता.