केंद्रीय पथक दाखल; राज्याबाहेरील विद्यार्थ्यांची सुरक्षेची मागणी
एनआयटीमध्ये तणावाची स्थिती कायम असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या तीन सदस्यीय पथकाने बुधवारी अभियांत्रिकी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या संस्थेत देशविरोधी कारवाया करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीबरोबरच राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी पाच मागण्या केल्या आहेत.
एनआयटीमधील स्थितीचा एकूण आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील तांत्रिक शिक्षण संचालक संजीव शर्मा आणि उपसंचालक (वित्त) फझल मेहमूद आणि जे. एम. झराबी यांनी तणाव निवारणासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना सुरक्षेची हमी देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे राज्याबाहेरील विद्यार्थी अवास्तव मागण्या करीत असल्याचा आरोप संस्थेतील अधिकाऱ्यांनी केला आहे.
याप्रकरणी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांनी या विद्यार्थ्यांना सुरक्षेची काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी सुरतमध्ये दिली. कॅम्पसमध्ये झालेल्या वादाबाबत चौकशी करण्याचे आश्वासनही मुफ्ती यांनी दिल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.
हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळण्याची आणि राज्य सरकारने त्यामध्ये लक्ष घालण्याची गरज असल्याचे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

एनआयटीमध्ये काय झाले?
’ ३१ मार्च : ट्वेन्टी २० विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून भारताच्या पराभवाबद्दल काही काश्मिरी विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. त्यास काही काश्मीरबाहेरील विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. त्यावरून काश्मिरी आणि काश्मीरबाहेरील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. त्यात काही जण जखमी झाले.
’ १ एप्रिल : काश्मीरबाहेरील विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये तिरंगा फडकावत एनआयटीच्या प्रशासकीय इमारतीसमोर ध्वजारोहणाचा प्रयत्न केला. तसेच ‘भारतमाता की जय’, ‘हिंदुस्थान जिंदाबाद-पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. काश्मिरी विद्यार्थ्यांनी प्रतिघोषणाबाजी केली. फुटीरवाद्यांना ‘धडा’ शिकवल्याबद्दल भाजप खासदार तरुण विजय यांनी ‘देशभक्त विद्यार्थ्यांचे’ कौतुक केले. या वादाच्या पाश्र्वभूमीवर एनआयटी प्रशासनाने वर्ग तात्पुरते बंद केले.
’ २ एप्रिल : विद्यार्थी, प्राध्यापकांना चिंता करण्याची गरज नसून, कॅम्पसमधील तणावाची स्थिती निवळेल, असे एनआयटीचे संचालक रजत गुप्ता यांचे आश्वासन. तणाव निवळण्यासाठी जिल्हा आणि स्थानिक प्रशासन संपूर्ण सहकार्य करीत असल्याची मनुष्यबळ विकास मंत्रालयाची माहिती.
’ ४ एप्रिल : पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल कॅम्पस परिसरात तैनात करून एनआयटीतील वर्ग सुरू. परिस्थिती नियंत्रणात आली असून, कॅम्पसमधील सर्व कार्यक्रम नियोजनानुसार होत असल्याची संचालक रजत गुप्ता यांची माहिती.
’ ५ एप्रिल : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून कॅम्पसमध्ये आंदोलन. या विद्यार्थ्यांनी कॅम्पस सोडून जाण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा, तर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनादरम्यान तिरंगा हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा या विद्यार्थ्यांचा दावा. पोलिसांनी वसतिगृहात घुसून मारहाण केल्याचाही दावा विद्यार्थ्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला.
’ ६ एप्रिल : मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे पथक एनआयटीत दाखल. काश्मीरमध्ये ‘भारतमाता की जय’ म्हणणाऱ्यांना मारहाण होत असल्याचे ट्वीट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. केंद्रीय पथक एनआयटीत दाखल होणे आणि केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करणे हे मेहबुबा मुफ्ती यांच्यावर केंद्राचा विश्वास नसल्याचे निदर्शक असल्याची ओमर अब्दुल्ला यांची टीका.