श्रीनगरमधील झकुरामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात निमलष्करी दलाचा एक जवान शहीद झाला आहे. तर लष्कराचे ८ जवान जखमी झाले आहेत. यातील ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. झकुरा श्रीनगरपासून ११ किलोमीटर अंतरावर आहे.

‘दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. सीमा सुरक्षा दलाच्या तीन कंपनी ड्युटी संपल्यानंतर कॅम्पवर परतत असताना हा हल्ला झाला,’ अशी माहिती आयजी एसएसबी दीपक कुमार यांनी दिली आहे.

‘दहशतवाद्यांनी जवानांच्या गाड्यांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र आसपासच्या भागात नागरी वस्ती असल्याने जवानांना चोख प्रत्युत्तर देताना मर्यादा आल्या. दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने ४० ते ५० राऊंड फायर केल्या’, अशी माहिती दीपक कुमार यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे.

गेल्या २७ दिवसांमधला दहशतवाद्यांचा हा सहावा हल्ला आहे. उरी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून वारंवार हल्ले होत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला पम्पोरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी सरकारी इमारतीवर हल्ला केला होता. या दहशतवाद्यांशी सैन्याची तीन दिवस चकमक सुरू होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.